होमपेज › Pune › उद्यानांपेक्षा नशेखोरांचे अड्डेच जास्त!

उद्यानांपेक्षा नशेखोरांचे अड्डेच जास्त!

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 1:02AMपुणे : अक्षय फाटक 

उद्याने अन् फेरफटका मारण्यासाठी किंवा निवांत वेळ घालविण्याच्या ठिकाणांपेक्षा खुलेआम नशा करण्याचे अड्डेच शहरात अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे या गर्दुल्यांनी शहरातील मोकळ्या जागा, मैदानांचे कोपरे, आडोशांची ठिकाणे, टेकड्यांच्या परिसरातला नशा करण्याचे हक्काचे ‘घर’च बनवले. गतआठवड्यात मध्यवस्तीतील नागझरी नाल्यात अशा नशेखोरांमुळे तीन जणांचा जीव गेल्याची ताजी घटना आहे.  त्यामुळे भविष्यात तरी अशी हत्यांकाडे होऊ नयेत, यासाठी  पोलिस, महापालिका प्रशासन शहरातील मोकळ्या जागा नशेखोरांच्या अड्ड्यांत रूपांतरित होणार नाहीत,  याची काळजी घेणार का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.  

शांत आणि सुसंस्कृत असलेले शहर स्मार्टसिटी होऊ  लागले आहे. नागरिक व बच्चे कंपनींच्या विरंगुळ्यासाठी शहरात ठिकठिकाणी महापालिकेने  उद्याने;  तर मुलांना मैदानी खेळ खेळता यावेत म्हणून मैदाने साकारली आहेत. याचा फायदाही शहरवासीयांना होत आहे. मात्र, फोफावत असलेल्या गुन्हेगारीमुळे ही उद्याने, मैदाने व मोकळ्या जागा खुलेआम नशेखोरांचे अड्डे बनत चालल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मुळा-मुठेच्या पात्रात ठिकठिकाणी झाडाच्या बुंध्याजवळ; तसेच आडोशाच्या ठिकाणी नशेखोर एकत्र येतात. त्यासोबतच कॅनॉलही या टोळक्यांचे ठिकाण झाले आहे. याबाबत तक्रार किंवा घटना घडल्यास काही दिवस लक्ष ठेवून नशेखोरांवर कारवाई होते; पण पुन्हा पुन्हा ‘जैसे थे.’ त्यामुळे या गर्दुल्यांचे  फावते.

अनेक उद्यानांच्या कोपर्‍या-कोपर्‍यात नशेखोर टोळक्याने बसलेले दिसतात.  काही वेळा येथील किरकोळ वादातून गंभीर गुन्हा घडतो. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात नागझरी नाल्यात अल्पवयीन मुलासह दोघांचा डोक्यात घाव घालून खून केल्याचे ताजे उदाहरण आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला  पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तिसर्‍याची ओळखही पटलेली नाही. यातील खून झालेले व आरोपी सर्वजण नशेखोर आहेत;  त्यामुळे आता अशा घटनांकडेे गांभीर्याने  पाहण्याची वेळ आली आहे. यात एकट्या पोलिस यंत्रणेलाच दोष देता येत नाही. कारण  महापालिकेने बांधून ठेवलेल्या वास्तू,  मोकळी मैदाने आणि शहरातील टेकड्या या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत नसल्याने ही ठिकाणे नशेखोरांसाठी फायद्याची ठरू लागली आहेत. काही जण केवळ गांजा, चरस, हेरॉईन अशा अमली पदाथार्र्ंची नशा करतात; परंतु त्यापुढेही जाऊन सहज उपलब्ध होणारे व्हाईटनर, बूटपॉलिश, नेल पॉलिश, स्टिकफास्ट, आयोडेक्स, नेलपेंट यांच्यातूनही नशा करता येते. याला अल्पवयीन मुले बळी पडत असून, ही बाब चिंताजनक आहे.

पुणे पोलिसांनी यापूर्वी व्हाईटनर विक्री करणार्‍यांची बैठक घेतली होती. तसेच, अठरा वर्षांवरील मुला-मुलींनाच व्हाईटनरची विक्री करावी. फक्त स्टेशनरीचा व्यवसाय करणार्‍यांना सुट्या स्वरूपात ते द्यावे आणि अन्य लोकांना बाटलीऐवजी व्हाइटनर पेनची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. प्रामुख्याने झोपडपट्ट्या व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हाईटनरचा दुरुपयोग होतो. तसेच, हे रोखण्यासाठी मुक्तांगण, संतुलन, स्नेहालय अशा विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले होते. पुणे पोलिसांकडे अमली पदार्थविरोधी सेल आहे. या सेलकडून अमली पदार्थविरोधी सप्ताह राबविला जातो. त्यामध्ये शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती केली जाते; पण व्हाईटनर व इतर गोष्टींची नशा करू नये म्हणून काहीही लक्ष दिले जात नाही.

शहरातील तीन भागांतील नशेखोरांचे अड्डे

कोथरूड : एकलव्य कॉलेजच्या पाठीमागे. म्हसोबा मैदान व टेकडीवर दूरदर्शन केंद्राजवळील झाडीत  वारजे :  वनदेवी मंदिराच्या पाठीमागील टेकडी. डी. पी. रोडवरील दुधानी लॉन्सपुढे, रमेश वांजळे ब्रिजच्या खाली महामार्गावरील रस्त्यावर   चतुःशृंगी :  जनवाडी (मॅफको कंपनी बंद, गांजा व दारू), फर्ग्युसन हनुमान टेकडी, औंधमधील नागराज चौक सार्वजनिक शौचालय.  भारती विद्यापीठ :  अप्पर डेपो मैदानात. महामार्गावर रात्री तसेच दिवसा गाड्यांमध्ये नशेखोर दारू पित बसलेले असतात.   खडक : कासेवाडीतील पाठीमागील नागझरी भाग, लोहियानगर लमके मळा, रविवारी बंद असताना टिंबर मार्केटमध्येही नशेखोरांचा वावर  

सिंहगड : सनसिटीच्या पाठीमागील नदीपात्र. हिंगणे व धायरीमधील कॅनॉलशेजारी. स्वामी नारायण मंदिराच्या पाठीमागे.   सहकारनगर :  तळजाई वसाहत लुंकड शाळा परिसर. संभाजीनगरकडून शंकर महाराज वसाहतीकडे जाणार्‍या रोडवर (पडीक  बांधकामात). के. के. मार्केट रात्रीच्या वेळी अड्डा.  दत्तवाडी : म्हात्रे पुलाखाली झाडांमध्ये. दत्तवाडीचा विसर्जन घाट. पर्वती मंदिरामागील टेकडीवर.   बिबवेवाडी :  सोळा एकर मोकळे मैदान. अप्पर डेपोत. जागडे वस्ती नाला.  स्वारगेट : डायस प्लॉट कॅनॉल. सी.एम.ई. कॉलनी परिसर. लक्ष्मी-नारायण थिएटर परिसर.  अलंकार : सिटी प्राईडच्या जवळील मोकळ्या जागेत. एसएनडीटीजवळील एसआरए बिल्डिंगच्या वर. शिवाजीनगर :  शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे पार्किंग. डेंगळे पुलाखाली.  

हडपसर : गावातील उड्डाणपुलाचा खालचा भाग. मगरपट्टा उड्डाण पुलाखाली. गाडीतळ व पीएमपीएमएनएलचे आवार. फुरसुंगी, शेवाळवाडी डेपोतील आवार. अमर कॉटेज येथील खेळाचे मैदान.  वानवडी : रामटेकडी परिसर. औद्योगिक वसाहतीत रात्रीच्या वेळी.  कोंढवा : बोपदेव घाट. वन विभाग परिसर. कृष्णानगर स्मशानभूमी पुलाखाली. एमसीएबी कार्यालयाजवळील कॅनॉल.  फरासखाना व समर्थ : नागझरी नाला; तसेच बुधवार पेठेत दिवसा व रात्री खुलेआम गांजा व दारू पिली जाते. दूधभट्टी, मच्छी मार्केट.   खडकी : गाडी अड्ड्याजवळील नदीपात्र. खडकी बाजारातील पाण्याची टाकी. खडकी बाजार परिसरातील झाडी. महादेववाडी स्मशानभूमी. संगम पुलाखाली.  विश्रामबाग : वैकुंठ स्मशानभूमीच्या पाठीमागील नाल्यात. म्हात्रे पूल, तसेच राजेंद्रनगरमधील काही भाग. शनिवारवाडा व थोरला शेख दर्गा परिसर.  येरवडा : डेक्क्कन कॉलेज दर्गा. गाडीतळ येरवडा. बालन्यायालय परिसरात रात्री. (ही फक्त शहरातील तीन भागातील नशेखोरांच्या अड्ड्याची नावे आहेत. आणखी अज्ञात स्थळांची भलीमोठी  यादी होऊ शकते.