Sat, Apr 20, 2019 18:35होमपेज › Pune › फिडर वायरसाठी रेल्वेला पाहिजेत आणखी 39 लाख 

फिडर वायरसाठी रेल्वेला पाहिजेत आणखी 39 लाख 

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 12:40AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने किवळेमधील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत बीआरटीएस रस्ता विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी रावेत येथे पुणे-मुंबई लोहमार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. तेथील सबडिव्हिजन स्थलांतरित करण्यासाठी पालिकेने 5 कोटी 77 लाख रुपये रेल्वेस अदा केले आहेत. आता 3 किलोमीटर अंतर फिडर वायर टाकण्यासाठी 38 लाख 87 हजार रुपयांची मागणी रेल्वेने पालिकेकडे केली आहे. 

पालिकेच्या वतीने सदर मार्गावर बीआरटीएसचा 45 मीटर रस्ता विकसित करण्यात काम सुरू आहे. त्यांची लांबी 11.8 किलोमीटर आहे. रावेत येथील निसर्ग दर्शन सोसायटी येथे पुणे-मुंबई लोहमार्गावर पालिका उड्डाणपूल (आरओबी) बांधणार आहे. त्याचे काम बी. जी. शिर्के कंन्स्ट्रक्शन कंपनीस 87 कोटी 47 लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर करून वर्कऑर्डर देण्यात आली आहे. निसर्ग सोसायटी येथील रेल्वे किलोमीटर क्रमांक 170/16ए-170/170ए मधील लोहमार्गावरील उड्डाणपुलाचे संकल्पचित्र (जीएडी) मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले. उड्डाणपुलाच्या संकल्पचित्रानुसार लोहमार्गाजवळील अस्तित्वात असलेले सबस्टेशन हलविण्याची गरज निर्माण झाली.

त्यानुसार मध्य रेल्वेने जागेवर पाहणी करून सबस्टेश स्थलांतरित करण्याचे अंदाजे खर्च तयार केला. सबस्टेशन स्थलांतरणासाठी 5 कोटी 78 लाख खर्च असून, तो मध्ये रेल्वेकडे जमा करण्याची मागणी 24 जुलै 2015 च्या पत्राद्वारे पालिकेकडे करण्यात आली. त्यानुसार पालिकेने 31 डिसेंबर 2016ला रेल्वेस 5 कोटी 55 लाख रूपये अदा केले. त्यानंतर केंद्रीय रेल्वे विद्युत विभागाच्या पुणे विभागाने 38 लाख 87 हजार रुपयांची मागणी केली. तसे, पत्र 14 मे 2018 ला पालिकेस प्राप्त झाले आहे. सदर सबस्टेशन हलविण्यासाठी 3 किलोमीटर अंतराची फिडर वायर टाकण्यात येणार आहे. त्या खर्चात वाढ झाल्याने सदर रक्कम रेल्वेने मागितली आहे. पुलाच्या कामास होणारी दिरंगाई टाळण्यासाठी ही रक्कम त्वरीत भरण्याची विनंती केली आहे. त्यामुळे हा निधी रेल्वेस अदा करणे पालिकेस क्रमप्राप्त आहे. अन्यथा सदर कामास आणखी विलंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार पालिकेच्या वतीने ही रक्कम लवकरच अदा केली जाण्याची शक्यता आहे. सदर रक्कम उड्डाणपुलाच्या कामाच्या तरतुदीमधून आदा केली जाणार आहे. त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.19) होणार्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. 

रेल्वे व लष्कराच्या संथगती कारभारामुळे प्रकल्पांना विलंब

पालिकेच्या वतीने शहरात अनेक विकास प्रकल्पांची कामे सुरू आहे. काही प्रस्तावित आहेत. मात्र, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या लष्करी जागा ताब्यात न मिळाल्याने प्रकल्पांना विलंब होत आहेत. रेल्वे संरक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. या पाठपुराव्यामध्ये अनेक वर्षे खर्ची पडत असल्याने पालिकेचे महत्वाचे प्रकल्प रखडत आहेत.