Tue, Jul 16, 2019 14:13होमपेज › Pune › राज्यात शंभर लाख टनाहून अधिक साखर उत्पादन होणार

राज्यात शंभर लाख टनाहून अधिक साखर उत्पादन होणार

Published On: Mar 01 2018 1:29AM | Last Updated: Mar 01 2018 1:10AMपुणे : किशोर बरकाले

राज्यात उपलब्ध उसाचे आणखी 224.41 लाख टन गाळप बाकी असल्याचे साखर आयुक्तालयाने घेतलेल्या ताज्या आढाव्यानुसार समोर आलेले आहे. त्यामुळे हंगाम 2017-18 अखेर सुमारे 972 लाख टनाइतके उच्चांकी ऊस गाळप होऊन साखरेचे 100 लाख टनाहून अधिक उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्क्त केला जात आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयाचा अंदाज वाढता वाढे असाच असून, साखर उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

चालू वर्षीच्या गाळप हंगामात सुमारे 9 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यातून हंगामाच्या सुरुवातीस सुमारे 650 लाख टन ऊस गाळप होऊन 11.30 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 73.33 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित धरण्यात आले होते. सद्यस्थितीत सुरुवातीच्या अंदाजापेक्षा अधिक साखर उत्पादन आताच हाती आलेले आहे. 99 सरकारी आणि 86 खासगी मिळून 185 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. 25 फेब्रुवारीअखेर 747.87 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होऊन 10.98 टक्के 82.08 लाख टन साखर उत्पादन हाती आलेले आहे. 

चालू वर्षीच्या हंगामअखेरीस एकूण ऊस गाळप 972.28 लाख टनाइतके होईल. राज्याचा सरासरी साखर उतारा 11.30 टक्के हाती येणे गृहीत धरले तरी सुमारे 105 लाख टनाहून अधिक उत्पादनाची शक्यता निर्माण झालेली आहे.

तसे झाले तर साखर उत्पादनाचा हंगाम 2014-15 मधील आजवरचा सर्वाधिक साखर उत्पादनाचा विक्रम मोडीत निघून, नवीन उच्चांक प्रस्थापित होऊ शकेल. हंगाम 2014-15 मध्ये  930 लाख टन ऊस गाळप झाले होते आणि 11.30 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 105 लाख टन साखर उत्पादन हाती आले होते. उच्चांकी ऊस गाळपाच्या शक्यतेने साखर आयुक्तालय, कृषी विभाग आणि कारखान्यांनी संयुक्तरीत्या दिलेले सुरुवातीचे अंदाज सपशेल चुकले आहेत.

पुणे विभागात सर्वाधिक ऊस शिल्लक

साखर आयुक्तालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये गाळपाविना शिल्लक असलेल्या उसाची माहिती उपलब्ध झाली. आणखी 225 लाख टन बाकी असल्याचे ताज्या माहितीतून दिसून आले आहे. त्यानुसार कोल्हापूर विभाग 39.30 लाख टन, पुणे विभाग 96.16, अहमदनगर 40.64, औरंगाबाद 21.04, नांदेड 27.27 लाख टन असा एकूण 224.41 लाख टन उसाचे गाळप शिल्लक असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

परतीच्या पावसामुळे ऊस पिकाला फायदा झाला असून, पाणी उपलब्धताही अधिक राहिली. त्यामुळे सरासरी हेक्टरी उत्पादकता 80 वरून 98 टन हाती येत आहे. ऊस गाळप हंगाम एप्रिल महिनाअखेरपर्यंत सुरू राहील. एकच शेतकरी उसाच्या नोंदी दोनपेक्षा अधिक कारखान्यांकडेही करीत असतात. त्यामुळे सध्याच्या 972 लाख टन ऊस गाळपाच्या सुधारित अंदाजात कमी-जास्त ऊस गाळप होऊ शकेल. मात्र, साखर उत्पादन शंभर लाख टनाहून अधिक होईल, अशी अपेक्षा आहे.     - दत्तात्रय गायकवाड, साखर सह संचालक (विकास), साखर आयुक्तालय.