Tue, Jul 23, 2019 06:32होमपेज › Pune › मोपेड बाईकवरून केला कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास

मोपेड बाईकवरून केला कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास

Published On: Jun 13 2018 1:54AM | Last Updated: Jun 13 2018 1:39AMपुणे : प्रतिनिधी

अनेक जण रेल्वे, बस किंवा विमानाने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करतात. मात्र, एका मायलेकींनी चक्क काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास आपल्या मोपेड बाईकवर केला आहे. मनाली आणि मन्वा भिडे अशी मायलेकींची नावे आहेत. 

त्या म्हणाल्या, आम्ही दोघी (मी आणि मन्वा) 31 मे 2018 ला स्वामी विवेकानंद दर्शन घेऊन कन्याकुमारी वरून 6 वाजता निघालो. आम्ही 8 दिवसात कन्याकुमारी-धरमपुरी-हुबळी, पुणे, वडोदरा, भिलवरा, रोहतक, पठाणकोट मार्गे श्रीनगरला 7 जून 2018 रोजी सायंकाळी 4.15 ला पोचलो 4025 कि.मी. अंतर पार केले. 9 दिवसांत पोचणार होतो, पण 1 दिवस आधीच पोचलो. तिथे पोचल्यावर परमोच्च आनंद मिळाला. स्वप्नपूर्ती केल्याचा तो आनंद होत होता.

बाईक चालवितांना झाशीच्या राणीप्रमाणे आपल्या मुलाला पाठीशी बांधल्याचा भास होत होता, तसेच पूर्ण राईडमध्ये मी मन्वाला सोबत घेऊन राईड पूर्ण केली. मला मन्वाने भरपूर साथ दिली रोज 12 तास ती गाडी वर बसून होती. पण तिने कधीही कंटाळा केला नाही. रोज नव्या उत्साहाने ती तयार होत होती. अवघ्या 14 वर्षाच्या माझ्या चिमुरडीचा हा उत्साह बघून मला पण रोज एनर्जी मिळत होती. आई मुलीचे नाते अजून घट्ट झाले. मन्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आज मी जी काही आहे, ते माझ्या 4 ‘स्ट्राँग पिलर्स’मुळे माझी मुलगी, माझी आई आणि माझ्या सख्या दोन बहिणींमुळे यांचा माझ्या आयुष्यात मोलाचा वाटा आहे. असेही त्यांनी सांगितले.

अवघ्या 8 दिवसांत 8 राज्यातून फिरलो तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांतून फिरलो. निसर्ग सौंदर्य भरभरून होते, जमेल तेवढे डोळ्यात आणि कॅमेर्‍यामध्ये साठवून घेतले आहे. भाषेचा प्रॉब्लेम खाली आला पण मागच्या वेळेचा अनुभव पाठिशी होता, त्यामुळे जरा सोपे गेले. जस जसे वर वर जात होतो, तस तसे भाषेचा प्रश्न सुटला. सर्रास हिंदी बोलले जात होते. खाली खायला डोसा, इडली, मेदुवडा, सांबार, उत्तप्पा, अप्पे, फिल्टर कॉफी, केळी, शहाळ, पायनापल ज्यूस, उटा (थाळी), तसेच महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन थाळी, जस जसे वर जात होतो तसतसे दाल बाटी, उंदियो, पंजाबी, पराठा, उसाचा रस, लस्सी, कावा, शिकंजी, सरबत यांसारखे पदार्थ खायला मिळत होते. असो गाडी स्टार्ट केल्यानंतर माझ्या मनाला भीती ना शंकेचा विचारही शिवला नाही. मी पूर्णपणे सकारात्मक राहिले, आपला प्रवास चांगलाच होणार आणि आपल्याला चांगलीच लोक भेटणार, असे मनाशी पक्के ठरवले होते आणि झाले ही तसेच, आम्हाला 8 ही राज्यामध्ये पोलिसाचा चांगला अनुभव आला.