Tue, Apr 23, 2019 07:57होमपेज › Pune › शहीद पोलिसांचे स्मारक त्यांच्याच शाळेत!

शहीद पोलिसांचे स्मारक त्यांच्याच शाळेत!

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:15AMपुणे : पुष्कराज दांडेकर  

कर्तव्य बजावताना शहीद झालेले पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बलिदानाची जाणीव, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राहावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतले, त्या शाळेतच त्यांचे ‘हुतात्मा स्मारक’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी थेट पोलिस महासंचालक कार्यालयातून आपापल्या घटकांतील संबंधित शाळांशी संपर्क साधण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. 

पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग यांनी राज्यातील पोलिस आयुक्त व जिल्हा अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर येथील टेकापूरला 4 ते 6 जानेवारीदरम्यान राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या झालेल्या परिषदेत दिलेल्या सूचनांवरून राज्य पोलिस दलाने हा निर्णय घेतला आहे. 

पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षक यांनी आपापल्या परिसरामधील शहीद झालेले पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी जेथे शिक्षण घेतले आहे, तेथील मुख्याध्यापक, प्राचार्यांशी संपर्क साधून शाळेत हुतात्मा स्मारक उभारावे किंवा शहिदांची छायाचित्रे दर्शनी भागात लावून, त्यांनी केलेल्या कामगिरीबाबतची माहिती नमूद करावी, असे म्हटले आहे. 

केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेश पोलिस दलाच्या प्रमुखांसोबत पत्रव्यवहार केला आहे.  विद्यार्थ्यांना शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यातच देशप्रेमाचे व देशसेवेचे बाळकडू मिळावे; तसेच बालक आणि तरुणांमध्ये हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

2015 मध्ये राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या झालेल्या परिषदेत हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी शिक्षण घेतलेल्या शाळा व  महाविद्यालयांमध्ये त्यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम राज्यांच्या पोलिस दलांनी आयोजित केला होता. याकडे गौबा यांनी 18 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्राद्वारे राज्यांच्या पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधले. दरवर्षी पोलिसांकडून हुतात्म्यांना आदरांजली 21 ऑक्टोबर रोजी असतो.