होमपेज › Pune › पैलवानांसाठी मासिक मानधन योजना

पैलवानांसाठी मासिक मानधन योजना

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:32AMपुणे ः

आंतरराष्ट्रीय पातळीवर मल्‍लांनी उत्कृष्ट कामगिरी करावी; तसेच महाराष्ट्राला पर्यायाने देशाला जास्तीत जास्त कुस्तीतून पदके मिळवून द्यावी, या हेतूने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, राष्ट्रीय तालीम संघ आणि पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘पैलवान मानधन’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्याच वर्षी तब्बल 19 मल्‍लांना मासिक मानधन देण्यात येणार आहे. 

पैलवान मानधन योजनेचे अध्यक्ष पै. मंगलदास बांदल यांच्या अध्यक्षतेखाली 2018 सालापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या मल्‍लाला या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ कमीत कमी दोन कोटी रुपये निधी देणगी स्वरुपात जमा करणार असून जमलेला निधी बँकेच्या ‘फिक्स डिपॉझिट’मध्ये जमा करुन त्यावर मिळणार्‍या व्याजावर ही मानधन योजना चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे आणि राष्ट्रीय तालिम संघाचे विश्‍वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.

या योजनेमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचा विचार करताना वरिष्ठ, युवा आणि कुमार गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राज्यस्तरीय अनुक्रमे 7 हजार, 5 हजार आणि 3 हजार रुपये मासिक मानधन, राष्ट्रीयस्तरीय अनुक्रमे 12 हजार, 10 हजार आणि 7 हजार तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीतील सुवर्णपदक विजेत्याला 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपये मासिक मानधन देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्‍त कुमार/युवा/वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील प्रावीण्यधारक मल्‍लास परदेशातील कुस्ती प्रशिक्षणासाठी 50 हजार रुपये मानधन स्वरूपात देण्यात येणार असल्याचे भोंडवे यांनी सांगितले.

मानधन योजनेचा आज होणार शुभारंभ

या मानधन योजनेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 25 )  दुपारी 4.30 वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगीरांचा गौरव तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू श्रेया कंधारे, संपदा बुचडे आणि आकांक्षा बुचडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही योगेश दोडके यांनी दिली.