Sun, Jun 16, 2019 02:21होमपेज › Pune › मान्सून आज केरळात

मान्सून आज केरळात

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) मंगळवारी, 29 मे रोजी दक्षिण केरळमध्ये दमदारपणे दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. स्कायमेटने मात्र केरळमध्ये मान्सून सोमवारीच दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, केरळबरोबरच लक्षद्वीप, तमिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण पश्चिम, मध्य व उत्तर पूर्व बंगालचा उपसागर, मालदीव, कोमोरीनचा उर्वरित भाग येथे येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. पुढील 2-3 दिवसात अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी काही भाग, अरबी समुद्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होईल. 

सध्या केरळ ते कर्नाटक किनारपट्टीलगत समांतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या स्थितीमुळे मान्सूनची वाटचाल झपाट्याने पुढे होईल, अशी माहिती देण्यात आली. 
राज्यात उकाडा कायम-

मान्सून केरळच्या वेशीजवळ आला असला तरीदेखील राज्यात तीव्र उकाडा कायम असून सोमवारी अकोला येथे उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भातील नागपूर 44.4, यवतमाळ 45.5, वर्धा 46.5, चंद्रपूर 45.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेल्याने विदर्भकर घामाघूम झाले. तर महत्त्वाच्या शहरांमध्ये पुणे 37.6, नगर 43.1, कोल्हापूर 37.4, सांगली 39, सातारा 36.7, सोलापूर 41.1, मुंबई 34, औरंगाबाद 42.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. 

जूनप्रारंभी महाराष्ट्रात

दक्षिण कर्नाटकात 30 मेपासून मोसमी पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन होऊ शकते, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. मान्सून सोमवारी अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाटासह व सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.