Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Pune › मान्सून लवकरच राज्यात

मान्सून लवकरच राज्यात

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 1:15AMपुणे/रत्नागिरी : प्रतिनिधी

दक्षिण अंदमानातील पोषक हवामानामुळे नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) शुक्रवारी देशात दाखल झाला. पुढील तीन ते चार दिवसांत तो पूर्ण सक्रिय होऊन, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 29 मेपर्यंत केरळातून मान्सून कोकणमार्गे राज्यात प्रवेश करेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. दुसरीकडे, गोवा व कोकणात मेनुकू वादळ धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामानाचा अंदाज घेत, मे अखेरीस मान्सूनच्या आगमनाची अटकळ बांधून कोकणात खरिपाच्या हंगामाच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारपासून बळीराजाच्या कृषी दैनंदिनीप्रमाणे धुळवाफ्यांचा प्रारंभ झाला. 

पुढील काही तासांत दमदार वाटचाल

मान्सूनची वाटचाल पुढील काही तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मागील वर्षी 95 टक्के पाऊस पडला होता.

साधारणपणे 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्याने हवामान विभागाने 23 मेपर्यंत मान्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता.

1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस बंदी

खराब वातावरणाने द. कोकणात मालवण पट्ट्यात शनिवारी रात्री उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळात मच्छीमारांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणातील सागर किनार्‍यावर यांत्रिक मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै पर्यंत सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैल अंतरापर्यंत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. जून व जुलै महिन्यामध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या काळात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होते.