Sun, Mar 24, 2019 10:45



होमपेज › Pune › येत्या पाच दिवसांत कोकण, घाटमाथ्यावरच पूर्ण सक्रिय राहण्याची शक्यता  हवामान विभागाचा अंदाज 

राज्यात २२ जूननंतरच मान्सूनचा जोर

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:01AM



पुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुढील पाच दिवस कोकण, घाटमाथा परिसरातच सक्रिय राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तो सध्या बरसणार नाही. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडेच राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात 22 जूनंतरच व सर्वार्थाने शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी ‘पुढारी’शी बोलताना वर्तविला आहे. 

पावसाने दांडी मारली असली तरीदेखील राज्यात ठिकठिकाणी जोरदार वारे वाहत आहे. मान्सून काळात असे वारे वाहत असतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यंदा चारही महिन्यांमध्ये खंडित पाऊस राहील व जुलै, ऑगस्ट महिन्यांत सर्वदूर जोरदार पाऊस पडेल. शेतकरी व नागरिकांनी चिंतीत होऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

गेल्या 24 तासात कोकण, गोव्यात बर्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मोठ्या पावसाची मात्र कुठेही नोंद झाली नाही. मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नसल्याने बुधवारी त्याने प्रगती केली नाही. मात्र, येत्या 72 तासात अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता असून मान्सून दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश येथे दाखल होईल. 

यंदा पाऊस खंडित स्वरूपात : बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील तापमानावर पाऊस अवलंबून असतो. सध्या समुद्राच्या पृष्ठ भागाचे तापमान कमी आहे.थंड पाण्यामुळे मान्सून सक्रीय नाही. समुद्रातील तापमान येत्या 7-8 दिवसांत वाढण्याचा अंदाज आहे. जून, जुलै महिन्यात पावसात बरेच खंड पडतील. मात्र, 2014, 2015 सारखी दुष्काळी परिस्थिती मात्र उद्भवणार नाही. मान्सून जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा सक्रीय होऊन सरासरी गाठेल. दुष्काळी मराठवाडा, विदर्भात धो-धो पाऊस बरसेल. कमी दिवसात अधिक पाऊस अशी यंदाच्या पावसाची खासीयत असेल, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. 

हवामान विभागाने केली घाई 

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आयएमडीने राज्यात मान्सून पोहोचल्याचे जाहीर करून घाई केली आहे. खुद्द आयएमडीच आता संभ्रमात असून, पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मान्सून व वारे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सध्या राज्यात पाऊस कमी व वारेच अधिक वाहत आहेत. कमी दाबाच्या क्षेत्रांवर पाऊस अवलंबून असतो. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीतील पाउस बंगालच्या उपसागरात निर्माण होणार्या कमी दाबाच्या क्षेत्रावर अवलंबून असतो. तर कोकण, मुंबईतील पावसाचे प्रमाण समांतर कमी दाबाच्या पट्ट्यावर अवलंबून असते, असे भौतिकशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

वेधशाळा म्हणते, 20 जूननंतर संततधार

वेधशाळेने पुणे शहरात 20 जूननंतरच संततधार पाऊस पडणार असल्याचीही शक्यता वर्तविली आहे. पुण्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीपेक्षा 3.6 मि.मी.ने अधिक म्हणजे 61.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु, या आकडेवारीत पूर्वमोसमी पाऊसच अधिक आहे. शहरात मान्सून दाखल झाल्यानंतर केवळ हलक्या सरींवरच नागरिकांना समाधान मानावे लागले आहे. पुणे शहर सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेकडे वसले असून, या पर्वतरांगांमध्ये पावसाचे ढग अडले जाऊन घाटमाथ्यावरच पाऊस पडतो. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यासच शहरात मुसळधार पाऊस पडतो. सध्यातरी अशी परिस्थिती नसल्याने पावसाने दडी मारली आहे. गेल्या वर्षी मान्सून 13 जून रोजी पुण्यात दाखल झाला होता. नंतर मात्र जून महिन्यात त्याने दडी मारली होती. त्यानंतर बॅकलॉग भरून काढत तो मनसोक्त बरसला व त्याने सरासरी पूर्ण केली होती.