Tue, Nov 13, 2018 06:04होमपेज › Pune › येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण कोकणात

येत्या ४८ तासांत मान्सून दक्षिण कोकणात

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) सोमवारी आणखी प्रगती करत दक्षिण कर्नाटक, तमिळनाडूचा संपूर्ण भाग, पुडुच्चेरी, रायलसीमा व आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला. येत्या 48 तासात राज्यात मान्सूनचा प्रवेश होणार असून दक्षिण कोकणात तो डेरेदाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर मध्यअरबी समुद्राचा आणखी काही भाग, उर्वरित कर्नाटक व रायलसीमा, गोवा, तेलंगाणा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग येथे देखील तो दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. 

गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होत उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. हर्णे, सातारा येथे प्रत्येकी 20 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत असून 9 ते 11 जूनदरम्यान संपूर्ण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण मध्य प्रदेश व छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, ईशान्य भारत, बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग येथे मान्सूनचे वारे पोहोचतील, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.