Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Pune › राज्यात मान्सूनचे आगमन

राज्यात मान्सूनचे आगमन

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

राज्यात मान्सूनचे गुरूवारी आगमन झाले असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरीपासून सोलापूर, नांदेडपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असल्यामुळे  शनिवारपर्यत मुंबईसह राज्याच्या आणखी काही भाग मान्सून व्यापणार आहे. तसेच सोमवारपर्यंत (11 जुन) मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात साधारणपणे 7 जूनला मान्सून दाखल होत असतो. यंदा नियोजित वेळेच्या एक दिवस उशीराने मॉन्सून दाखल झाला आहे. मान्सून राज्यात दाखल होण्यास सुमारे  11 दिवसांचा कालावधी लागला. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या काही भागात दाणादाण उडवली. मेघगर्जना, विजांचा कडकाडाट तसेच वादळी वा-यासह मॉन्सूनपूर्व पावसाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली 

राज्याच्या काही भागात अतिवृष्टी

शुक्रवारी राज्यातील कोकण आणि मध्य-महाराष्ट्रातकाही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. 10, 11 आणि 12 जूनला कोकणात  मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारपासुन सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्यांमध्ये वादळी वारे, जोरदार पावसाने चारापिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नांदेडमध्ये जोरदार पाउस पडला आहे.विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

उमरगा, लोहार्‍यात अतिवृष्टी!

औरंगाबाद ः  मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांवर मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच मेहेरबान झालेला आहे. शुक्रवारी (दि. 8) सकाळी संपलेल्या चोवीस तासांत लातूरमधील पाच आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये सरासरी 65 मिलिमीटरपेक्षा पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. मराठवाड्यातील 421 मंडळांपैकी तब्बल 38 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यात चोवीस तासांत 133 मिलिमीटर, लातूरमधील निलंगा तालुक्यात 92 मिलिमीटर पाऊस पडला. औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी हे चार जिल्हे कोरडेच राहिले.
अर्ध्या मराठवाड्याला या पावसाने धो-धो बरसत अक्षरशः झोडपून काढले. एका दिवसाच्या धुवाँधार पावसाने मराठवाड्यातील अनेक तालुक्यांनी या मोसमातील आतापर्यंतच्या पावसाची शंभरी ओलांडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात आतापर्यंत सरासरी 226.80 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तसेच लोहारा तालुक्यात सरासरी 119 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, भोकर, नांदेड, कंधार, हदगाव, हिमायतनगर. लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, चाकूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यांतही पावसाने शंभरपेक्षा जास्त सरासरी ओलांडली आहे.

ढगफुटीसारखी स्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सलामीलाच वरुणराजाच्या तुफानी बॅटिंगमुळे उमरगा, लोहार्‍यात ढगफुटीसारखी स्थिती उद्भवली. एकाच रात्रीत उमरगा शहरात 200 मिलिमीटर पाऊस कोसळला, तर उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यांतही पाणी पाणी झाले.