Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Pune › ‘प्रोक्युअरमेंट डॅशबोर्ड’द्वारे  ‘ई-ट्रेडरिंग’वर देखरेख

‘प्रोक्युअरमेंट डॅशबोर्ड’द्वारे  ‘ई-ट्रेडरिंग’वर देखरेख

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘ई-ट्रेडरिंग’ या अद्ययावत पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, सद्यःस्थितीमध्ये प्रकल्पाची निविदा प्रक्रिया कोणत्या पातळीवर आहे? ‘वर्कऑर्डर’ दिला का, हे महापालिकेचे आयुक्त व संबंधित विभागप्रमुखास समजत नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी ‘ई-ट्रेडरिंग’मध्ये समन्वय साधत त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी ‘प्रोक्युअरमेंट डॅशबोर्ड’ ही सॉफ्टवेअर यंत्रणा महापालिका कार्यान्वित करणार आहे. त्यामुळे ‘ई-ट्रेडरिंग’प्रक्रियेस म्हणजे ‘ई-गर्व्हनन्स सिस्टिम’ला अधिक गती मिळणार असल्याचा  प्रशासनाचा दावा आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिका ‘ई-ट्रेडरिंग’च्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवते. ही यंत्रणा संगणकीय व ऑनलाईन आहे. मात्र, या प्रकियेचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे, संबंधित निविदा प्रक्रिया राबविणे, प्रसिद्ध करणे, त्यास मिळालेला प्रतिसाद, नव्याने निविदा काढणे, निविदा स्वीकारणे, कामाच्या वर्कऑर्डर देणे आदी कामे कोणत्या पातळीवर आहेत? यासंदर्भातील परवानगी आणि मान्यतेसंदर्भातील फाईलला कोणत्या विभागात किती वेळ लागला? त्यात किती कालावधी गेला,  हे संबंधित विभागप्रमुख व आयुक्तांना ऑनलाईन समजत नाही. 

नव्या सॉफ्टवेअर यंत्रणेमुळे ही प्रकिया सेवा व वस्तू खरेदी करणार्‍या संबंधित विभागप्रमखांसह आयुक्तांना त्वरित समजणार आहे. एखाद्या विभागात काम रखडल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकार्‍यांना आयुक्त सूचना देऊन प्रसंगी कारवाई करू शकतात. त्यामुळे सदर प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.

सदर सॉफ्टवेअर डिझाईन करणे, ती कार्यान्वित करण्यासाठी 23 लाख 62 हजार 500 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेने 24 नोव्हेंबरला निविदा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निविदा 24 डिसेंबरपर्यंत स्वीकारली जाणार आहे. 

प्रकल्पाची सद्यःस्थिती समजणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे कामाच्या खर्चाचे दरपत्रक ठरविणे, निविदा तयार करून ती प्रक्रिया राबविणे, निविदा उघडणे, निविदेची निवड, वर्क ऑर्डर देणे आदी कामांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ‘प्रोक्युअरमेंट डॅशबोर्ड सॉफ्टवेअर’ विकसित करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपही विकसित केले जाईल. त्यामुळे आयुक्तांसह विभागप्रमुखांना या प्रक्रियेतील सद्यःस्थिती लगेच लक्षात येऊन कामाची गती दिसून येईल. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष कामांची स्थितीवर लक्ष ठेवणारी सॉफ्टवेअर यंत्रणा विकसित केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी सांगितले.