Sun, Mar 24, 2019 06:12होमपेज › Pune › सनियंत्रण समिती असून अडचण अन् नसून खोळंबा

सनियंत्रण समिती असून अडचण अन् नसून खोळंबा

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 12:04AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रदीप लोखंडे

महावितरणच्या जिल्ह्यात सनियंत्रण समिती बनविण्यात आल्या आहेत. या समितीचे कामकाज व्यवस्थित होत नसताना शहर विधानसभा मतदारसंघनिहाय वीज वितरण समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सध्याची समिती म्हणजे असून अडचण अन् नसून खोळंबा अशी स्थिती आहे. त्यामध्येच दुसरी विधानसभा मतदारसंघनिहाय समिती कशासाठी, असा सवाल सनियंत्रण समितीचे सदस्य विचारत आहेत. 

केवळ भाजपमध्ये मोदी लाटेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नवीन समितीची तरतूद केली आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सनियंत्रण समिती अस्तित्वात आहेत. ज्या योजनांचा आढावा सर्व सभासदांच्या बैठकीत घेतला जातो, त्याच योजना राबविण्यात  येतात. जिल्हास्तरीय समितीत जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार आणि पक्षांचे काही तज्ज्ञ हे सदस्य म्हणून असतात.

पालकमंत्री हा समितीचा अध्यक्ष असतो; मात्र आज परिस्थिती अशी आहे की, जिल्हास्तरीय समितीच्या बैठका सहा-सहा महिने होत नाहीत, तर खालची समिती काय दिवे लावणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पूर्वीच्या आघाडी सरकारच्या  काळात बैठका नियमित होत असत. भाजपच्या काळात बैठका होत नाहीत.  इन्फ्रा-1 ही योजना आघाडी सरकारच्या काळात  यशस्वी झाली; मात्र इन्फ्रा-2 योजनेचा अडीच वर्षांत बोजबारा उडाला आहे.

समितीचे कार्य 

शासनाच्या व केंद्राच्या नवीन योजना महावितरणकडून राबविली जातात की नाही याबाबत आढावा घेणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, जनतेच्या मागणीनुसार वीजजोड देणे, नवीन काही कामे सुचविणे; तसेच आमदार फंड निधीतून ती कामे करून घेणे व जनतेला 24 तास  सुरळीत वीजपुरवठा करणे, अधिकार्‍यांसोबत समन्वय ठेवणे, महसूलवाढीसाठी प्रयत्न करणे ही सनियंत्रण समितीची कामे आहेत.