Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Pune › वडगावमध्ये हक्कांच्या मतांसाठी पैशांचा बाजार

वडगावमध्ये हक्कांच्या मतांसाठी पैशांचा बाजार

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 12:59AMवडगाव मावळ  :  गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायतच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच हक्कांच्या मतांसाठी पैशांचा बाजार झाला असल्याचे समोर आले असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. निवडणूक म्हटले की, पैशांची उलाढाल हे समीकरणच असले तरी वडगाव नगरपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून मात्र या समीकरणामध्ये काहीसा बदल झालेला पहायवयास मिळाला. उमेदवारी अर्ज भरल्यापासून मतदान होईपर्यंत फक्त मतदान खरेदीचाच प्रयत्न इच्छुकांकडून केला जात होता.

यापूर्वी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने मतांचा आकडा गाठण्यासाठी हक्काची मते गृहीत धरून उरलेल्या स्थलांतरीत मतदारांना पैशाचे अमिष दाखवले जात होते. परंतु, या निवडणूकीत मात्र सर्वप्रथम हक्कांची मतेच ताब्यात ठेवण्यासाठी पैशाचा बाजार झाल्याचे पहावयास मिळाले.

याचे प्रमुख कारण म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी, वडगाव-कातवी नगरविकास आघाडी अशा तीनही पॅनेलचे उमेदवार सक्षम व शहरातील तळागाळातील नागरिकांच्या संपर्कातील होते; तसेच, प्रभागातील उमेदवारही संबंधित प्रभागातील नागरिकांच्या संबंधातील होते. त्यामुळे आपल्या हक्काचे मतदार प्रतिस्पर्धी उमेदवाराने वश करू नये यासाठी प्रत्येक उमेदवाराने हक्काच्या मतदारांना प्रथम ताब्यात ठेवण्यासाठी पैसे वाटप सुरु केले. यामध्ये काही उमेदवारांनी तर स्वत:च्या भावकीतील मतदारांनाही पैसे वाटप केल्याची चर्चा आहे. 

काही प्रभागांमध्ये मताला 10 हजार तर काही प्रभागांमध्ये मताला 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत वाटप करण्यात आल्याची चर्चा असून, बहुसंख्य मतदारांनी सर्वच उमेदवारांकडून पैसे घेतल्याने एका कुटूंबात कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त दिड लाखांपर्यंत रक्कम पोहोचल्याची चर्चा आहे.

निकालाचा  अंदाजही ‘पर्चेस‘ मतांवर अवलंबून ?

दरम्यान, निवडणूक निकाल 20 तारखेला असल्याने आता मतांच्या आकडेवारीवरून निकालाचा अंदाज लावण्याची चढाओढ सगळीकडे सुरु असून यामध्येही ‘पर्चेस‘ मतांचाच गांभीर्याने विचार केला जात आहे. कोणी किती मते खरेदी केली त्यावरच विजयाचे गणित सध्या सुरु असल्याची चर्चा आहे.