Fri, Apr 26, 2019 10:07होमपेज › Pune › वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग 

वैद्यकीय अधिकारी महिलेचा विनयभंग 

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 29 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा कामावर असताना अंधाराचा फायदा घेऊन अज्ञाताने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आवारात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिला डॉक्टरने फिर्याद दिली आहे. 

पुणे कॅ न्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालय आहे. याठिकाणी फिर्यादी या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर आहेत. दरम्यान त्या मंगळवारी बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील महिला रुग्णांची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी रुग्णालयाच्या आवारात कार लावली. त्या रुग्णालयात आल्या. परंतु, त्यांची बॅग विसरल्याने त्या परत कारकडे गेल्या. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तोंडाला बांधून आलेल्या एकाने त्यांच्या खांद्याला हात लावला. अचानक झालेल्या याप्रसंगामुळे महिला डॉक्टर या घाबरून गेल्या. त्यांनी आरडा-ओरडा करताच आरोपी तेथून पसार झाला. आवाज ऐकून प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयातील कर्मचारी तेथे आले. 

घटना घडल्यानंतर त्या महिला डॉक्टरने घडलेल्या प्रकाराबाबत लेखी रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. दरम्यान याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिणामी भविष्य काळात एकही प्रशिक्षणार्थी डॉक्टरला पटेल रुग्णालयात पाठविण्यात येणार नाही, असा निर्णय ‘एएफएमसी’ने घेतला आहे.