पिंपरी : प्रतिनिधी
एक महिन्यानंतर चिंचवड मधील मोहननगर परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तीन जणांनी मिळून सात वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार शुक्रवारी (दि 12) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण असून पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दहशत बसविण्यासाठी वारंवार वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. शहरातील भोसरी, पिंपरी, काळेवाडी, निगडी आदीसह विविध परिसरात या घटना सातत्याने घडत आहेत. त्याला आळा बसावा म्हणून पोलिसांनी 28 जून पासून ऑपरेशन ऑलआऊटची सुरुवात केली; मात्र अद्यापही गुन्हेगारांवर धाक नसल्याचे चित्र आहे. शहरातील मोहननगर परिसरात शुक्रवारी पुन्हा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
चिंचवड, मोहननगर परिसरात तीन जणांनी हातात कोयते घेऊन दंगा केला. संबंधीतांनी मोहननगर परिसरात पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडफोड करणार्या आरोपींची ओळख पटली आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.परिमंडळ तीनचे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 जून रोजी ऑपरेशन ऑल आऊट केले होते. त्यामध्ये 279 गुन्हेगारांवर कारवाई केली होती. एकाच वेळी एवढ्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्याने शहरातील गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली होती. यापूर्वी 18 जून रोजी भोसरीतील आदिनाथनगर व इतर परिसरात दोन वेळा वाहनांची तोडफोड झाली. याामध्ये वाहनांचे नुकसान झाले होते. त्याच दरम्यान निगडीत वाहनांची तोडफोड झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला होता. काही काळ वाहनांची तोडफोड बंदही करण्यात आली. त्यानंतर 12 जुलै रोजी ही तोडफोड झाली. यावरून सुमारे एक महिन्याच्या कालावधीनंतर गुन्हेगार पुन्हा आपले डोके वर काढत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस प्रशासनाला यामध्ये यश येणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.