कोंढवा : वार्ताहर
गो हत्या करणे पाप मग, थापा मारणे सुध्दा पापच आहे. पहिला गुन्हा मोदींवर दाखल व्हायला हवा. खोटे बोलून लोकांची फसवणूक करणार्यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी. शिवसैनिक घरचा रस्ता दाखवतील. 2014 चा सूड घ्या मतभेद बाजूला ठेवा व पुन्हा एखदा हडपसर मतदार संघावर भगवा फडकवा. असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महंमदवाडी येथे नागरिकांना व शिवसैनिकांना केले.
महंमदवाडी कौसरबाग प्रभाग क्रमांक 26 मध्ये हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेविका प्राची आशिष आल्हाट यांच्या प्रयत्नातून 18 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले. त्यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहरप्रमुख महादेव बाबर उपस्थित होते. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देशमुख, गटनेते संजय भोसले, अमोल हरपळे, तानाजी लोणकर, नगरसेविका संगिता ठोसर, सचिन तरवडे, अभिमान्यू भानगिरे, प्रशांत लोणकर, संजय शिंदे, बाळासाहेब भानगिरे, जयसिंग भानगिरे, पोपटराव आंबेकर आदींसह परिसरातील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या माध्यमातून लुल्लानगर, सय्यदनगर, मांजरीचा रेल्वे उड्डाणपूल मार्गी लावला असून, बकरी हिलच्या पाईप लाईनचे काम लवकरच मार्गी लागेल. पिपंरी चिंचवड महापालिकेतील 90 कोटींचा भ्रष्टाचार शिवसेनेने बाहेर काढला आहे. वनविभागामध्ये जी कामे अडली गेली होती ती मार्गी लावण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केली आहेत. सूत्रसंचालन शंशाक मोहिते यांनी केले तर, आभार जयसिंग भानगिरे यांनी मानले.