Fri, Jul 19, 2019 18:08होमपेज › Pune › माओवाद्यांच्या पत्रात मोदींच्या नावाचा उल्लेख

माओवाद्यांच्या पत्रात मोदींच्या नावाचा उल्लेख

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाच संशयित माओवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख असल्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी स्पष्ट केले. 

तर कोरेगाव-भीमा येथील लढाईस 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन केले गेले होते. या परिषदेच्या आयोजनामागे नक्षलवाद्यांचे पाठबळ होते. त्याकरिता कॉ. सुधीर ढवळे यांना सुरेंद्र गडलिंग व शोमा सेन यांच्या माध्यमातून पैसा पुरवण्यात आला. मात्र, दुसर्‍याच दिवशी घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचाराबाबात अद्याप तरी एल्गार परिषदेचे संबंध आढळलेले नसून, याबाबत तपास सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुणे पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या शहरी माओवादी चळवळ, या विषयावर वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील वाढत चाललेला नक्षलवाद, त्यासोबतच त्यांची कार्यपद्धती याची सविस्तर माहिती दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेेंद्र पाटील यांनी कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्ष रोहित आठवले, खजिनदार ब्रिजमोहन यांच्यासह सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कदम म्हणाले, नरेंद्र मोदींचा एका पत्रात उल्लेख आहे. दुर्दैवाने तेच पत्र माध्यमांमध्ये व्हायरल झाले. त्याचा पोलिसांशी संबंध नाही. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे 200 ते 250 पत्रे सापडली आहेत. या पत्रांमध्ये केंद्र सरकार ज्या पद्धतीने पुढे जात आहे, तशा प्रकारे राज्य सरकारे पुढे जात असतील, तर आपले अस्तित्व धोक्यात येईल, असा उल्लेख आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि कामगारवर्ग  नक्षलवाद्यांचे टार्गेट आहे. त्यांचे लक्ष्य दीर्घकालीन सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून प्रस्थापित राजसत्ता उलथवून टाकणे हे आहे. त्याकरिता पार्टी, सशस्त्र सेना व युनायटेड फ्रंट या तीन माध्यमांचा वापर होत आहे. ज्याठिकाणी शासन व्यवस्था नाही, तेथे सशस्त्र सेनेची उभारणी होते. शहरातील उपेक्षित घटक, विद्यार्थी, कामगार यांच्या संघटनांत ते हळुवार शिरकाव करतात. 

प्रथम सनदशीर मार्गाने व्यवस्थेविरोधात लढा देतात. नंतर रोहित वेमुला आत्महत्या, अफजल गुरू फाशी, दलित अत्याचार अशा प्रकरणांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. सनदशीर मार्गाने समस्येचे निराकरण न झाल्याने, आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंसा अपरिहार्य असल्याचे सांगत, असंतोषाला क्रांतिकारी विचारसरणीची जोड दिली जाते. शहरी भागातून बुद्धिवंतांची भरती करून, त्यांना जंगलाशी जोडले जात आहे. नक्षलवाद्यांची जंगलातील चळवळ व शहरातील चळवळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फ्रंट ऑर्गनायझेशनद्वारे शहरी भागात कट्टर माओवादी विचारसरणीचे कार्यकर्ते तयार केले जातात. मिलिंद तेलतुबंडे आणि प्रकाश हे दोन सध्या माओवादी नेते भूमिगत राहून चळवळ चालवत आहेत. शहरी भागातील सर्व पत्रव्यवहार संगणकाच्या माध्यमातून सुरू असून, प्रकाश हे काम पाहून केंद्रीय समितीकडे पत्र पाठवत आहे. सोशल मीडियाचा नक्षलवादी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यातील आशय आपण तपासून पाहिला, तर त्यात आतिशयोक्ती आढळून येईल, असे कदम यांनी यावेळी सांगितले. 

माओवाद्यांकडून बॅलेटला बुलेटचे उत्तर

हिंसेशिवाय मतदानाच्या (बॅलेट) माध्यमातून माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून सकारात्मक बदल करावा अशी चर्चा होते. मात्र, माओवादी शस्त्र खाली ठेवत नाहीत. कारण निवडणुकीवर पैशाचा प्रभाव असून, बॅलेटच्या माध्यमातून खरे जनमत व्यक्त होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हिंसा आम्ही स्वीकारली नसून, ती आमच्यावर लादण्यात आली आहे; त्यामुळे हिंसा अपरिहार्य असल्याचे ते सांगतात. मात्र, हिंसेचा वापर होतो, त्यावेळी त्यातून प्रतिहिंसा तयार होते आणि त्यातून फक्त रक्त सांडत असते. त्यातून नेमके काही साध्य होत नाही, हे त्यांनी सामजून घेतले पाहिजे, असे कदम यावेळी म्हणाले. 

कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी नक्षलवादाचा संबंध नाही

एल्गार परिषदेत ढवळे यांनी सुमारे 160 वेगवेगळ्या संघटनांशी संपर्क साधत, परिषदेच्या आयोजनाची तीन ते चार महिने बांधणी केल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले आहे. एल्गार परिषदेच्या व्यासपीठावरील सर्वांचा नक्षलवाद्यांशी संबंध आला असे मी म्हणणार नाही. आमदार जिग्नेश मेवानी यांच्या भाषणात कोणतीही वावगी गोष्ट सकृत्दर्शनी आढळून आली नाही. एल्गार परिषदेस माओवाद्यांनी पैसा पुरवला; मात्र त्यानंतर दुसर्‍याच दिवशी घडलेल्या कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. याबाबत विशेष तपास पथक तपास करत आहे.