होमपेज › Pune › मोदीही भेटतात; तुम्हाला वेळ नाही का?

मोदीही भेटतात; तुम्हाला वेळ नाही का?

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी

आमदारांची कामे करण्यास आणि त्यांना भेटण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी चांगलेच फैलावर घेतले. आमदारांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींना वेळ आहे आणि तुम्हाला नाही का? अशा शब्दांत त्यांनी या अधिकार्‍यांचा समाचार घेतला.    

जिल्ह्यात विकासकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. मात्र, ही कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन ती केली जात नाहीत. तसेच स्थानिक आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती देण्यासाठी अधिकार्‍यांना वेळ नाही, अशा तक्रारी विधानभवनाच्या सभागृहामध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी केल्या. त्यावर जिल्ह्यातील किती आमदारांना भेटला, असा सवाल बापट यांनी एका अधिकार्‍याला केला. त्यावर एका अधिकार्‍यांने चार ते पाच आमदारांना भेटल्याचे सांगताच बापट संतापले. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमार्फत राबविण्यात येणार्‍या विकास कामासंदर्भात लोकप्रतिनिधी विविध सूचना करतात. याचे निराकरण करताना अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यायला हवे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही बापट यांनी त्यांना सुनावले.

श्रेय घ्या पण, कार्यक्रमाला बोलवा

जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदामार्फत होत असलेली विकासकामे ही जनतेच्या पैशांतून केली जातात. उद्घाटनास स्थानिक खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पं. स. सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना निमंत्रित करणे आवश्यक आहे. मात्र, निमंत्रणच दिले जात नाही. कामांचे श्रेय ज्यांना घ्यायचे आहे, त्यांनी घ्यावे, परंतु लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाला निमंत्रित करा, असे बापट म्हणाले.

आमदारांनीही जिल्हा परिषद सदस्यांना बोलवावे

अनेक विकासकामे ही केवळ जिल्हा परिषदेचीच नसतात, अशा कामांच्या उद्घाटनासाठी अनेक जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, आमदार आणि पालकमंत्र्यांनाही बोलावले जात नाही, अशांवर कारवाई करणार असल्याचे बापट यांनी बैठकीत सांगितले़  त्यावर बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी आमदारांनीही त्यांच्या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्यांना बोलावले पाहिजे, परंतु तसे होत नसल्याचे देवकाते यांनी सांगितले.