Sun, Mar 24, 2019 23:42
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘ससून’च्या भवितव्यासाठी ‘मिस्ड कॉल’चा ‘पुढारी’कडे पाऊस

‘ससून’च्या भवितव्यासाठी ‘मिस्ड कॉल’चा ‘पुढारी’कडे पाऊस

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

ससून  रुग्णालयाचा कायापालट करणारे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईला झालेल्या बदलीच्या विरोधात अनेक सुजाण नागरिकांनी ‘मिस्ड कॉल’ देत आपला विरोध व्यक्त केला. या बदलीमुळे ससूनमधील ‘सीएसआर फंड’ सह अनेक उपक्रम ठप्प होतील, या काळजीने दोन हजार नागरिकांनी डॉ. चंदनवाले पुण्यातच राहावे यासाठी पठिंबा दिला. ‘पुढारी’ चे वृत्त समाजमाध्यमातून पूर्ण राज्यात व्हायरल झाले. 

ससूनमध्ये गुरुवारी दिवसभर ‘पुढारी’च्याच वृत्ताची जोरदार चर्चा सुरू होती. परखडपणे जनभावना मांडल्याबद्दल अनेकांनी ‘पुढारी’चे आभारही मानले. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता डॉ. चंदनवाले यांना जनमानससातून किती पाठिंबा आहे, याचा प्रत्यय आला. शासकीय आदेशाचे पालन करणे हे माझे कामच आहे. मी येथे राहीन किंवा नाही, परंतु मोठ्या प्रमाणात पाठिंब्याबद्दल डॉ. चंदनवाले यांनी नागरिकांचे आभार मानले.  

ससूनमधील अधिकारी व कर्मचारी आणि रुग्णांनी डॉ. चंदनवाले यांची बदली रद्द करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवित, हे निवेदन मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंंत्री, डीएमईआर सचिव, राज्यपाल यांना पाठवली. त्यामुळे शासनावर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला आहे.

दोन हजारांवर मिस्ड कॉल

डॉ. चंदनवाले यांची पुण्याबाहेर बदली होऊ नये असे वाटत असेल तर ‘पुढारीला मिस्ड कॉल द्या’ या आवाहनाला पुण्यासह राज्यातून वाचकांनी, डॉक्टर, रुग्ण, विविध संघटना, ससूनच्या दात्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पहाटे पाच वाजल्यापासून  गुरुवारी सायंकाळपर्यंत दोन हजार मिस्ड कॉलची नोंद झाली होती. दर मिनिटाला चार कॉल येत होते. त्यामुळे मोबाईलची बॅटरी तीन वेळा रिचार्ज करावी लागली. एखाद्या अधिकार्‍याबद्दल मोबाईल मिस्ड कॉलद्वारे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.