Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Pune › सौरऊर्जा, सीएनजीचा स्मार्ट सिटीत अत्यल्प वापर

सौरऊर्जा, सीएनजीचा स्मार्ट सिटीत अत्यल्प वापर

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:09AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत वाहनांसाठी सीएनजी इंधन आणि विजेसाठी सौरऊर्जेचा वापर खूपच अत्यल्प आहे. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. सीएनजी इंधन व सौरऊर्जा हा अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरामध्ये 2.5 टक्कांपेक्षा अधिक प्रमाणात अपारंपरिक विजेचा वापर होतो, त्या शहराला पर्यावरणपूरक शहर (ग्रीन सिटी) म्हणून ओळखले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्येमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्येने अक्षरश: लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. त्याचबरोबर नागरिकांचे जीवनमान उंचावल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. आधुनिक जीवनशैली राहणीमानातील एक महत्वाचा घटक बनला आहे. त्यामुळे वीज, पेट्रोल व डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन वायू व ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे, असे धक्कादायक चित्र पालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 

शहरात अपारंपरिक ऊर्जेचा वापर हा पारंपारिक वीज वापराच्या प्रमाणात अत्यल्प आहे. घरगुती, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठी आणि पथ दिव्यासाठी महावितरणाचा वीजेचा सर्वांधिक वापर होतो. पालिकेच्या सर्व इमारती व कार्यालयासाठी सन 2017-18 या वर्षात एकूण 5 लाख 50 हजार 275 किलावॅट विजेचा वापर झाला आहे.  

शहरात मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल इंधनाचा सर्रासपणे वाहनांसाठी वापर केला जात आहे. शहरात एकूण 18 सीएनजी पंप आहेत. एक एप्रिल  2017 ते 31 मार्च 2018 या वर्षांत शहरात सीएनजीचा वापर केवळ 39 हजार 280.80 मेट्रिक टन इतका करण्यात आला आहे. हा वापर घरातील स्वयंपाकासाठी आणि वाहनांसाठी झााला आहे. 

पालिकेच्या वतीने सौर उर्जेतून वीज निर्मिती उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. पालिका भवनावर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत यशंवतराव चव्हाण स्मृती रूग्णालय व रावेत जलशुद्धीकरण केंद्र येथे सौर पॅनेल बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. आवश्यकेतनुसार इतर इमारतींवरही सौर पॅनेल बसविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. 
त्याचबरोबर नागरिकांमध्ये सौरऊजचा वापर वाढावा म्हणून पर्यावरणपूरक हाउसिंग सोसायटी स्पर्धा पालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनेक हाउसिंग सोसायट्या सौर पॅनेल बसवून घेण्यास पुढे येत आहेत. 

शहरातील 1 हजार 170 इमारतींवर सौर पॅनेल 

पिंपरी-चिंचवड शहरात सन 2017-18 वर्षांत 1 हजार 170 इतारतींवर सौर तापक (पॅनेल) यंत्रणा बसविण्यात आले आहे. पालिकेने 4 हजार चौरस मीटर आकारावरील बांधकामास परवानगी देताना सौरऊर्जेचा वापर करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. तसेच, काही पर्यावरणपूरक हाउंसिग सोसायट्या सौरऊर्जेचा वापर करून विजेचा वापर करीत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र ही संख्या वाढण्याची गरज आहे.