Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Pune › चार वर्षांत अडीच हजार अल्पवयीन मुलींचा गर्भपात

चार वर्षांत अडीच हजार अल्पवयीन मुलींचा गर्भपात

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:04AM पुणे ः प्रतिनिधी

सुसंस्कृत पुण्यात गर्भपाताचे प्रमाण वाढले असून, गेल्या चार वर्षांत अल्पवयीन आणि किशोरवयीन अशा दोन हजार 400 मुलींनी गर्भपात केला आहे. याला लैंगिक शिक्षणाचा अभाव, सिनेमाचा प्रभाव, स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार व इतर घटक कारणीभूत ठरत आहेत. ही आकडेवारी वर्षानुवर्षे वाढत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. 

सध्या बागेत व इतर ठिकाणी अल्पवयीन मुलामुलींची ‘चाळे’ पाहायला मिळतात. तसेच गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या नावाखाली मैत्री वाढवणे आणि नंतर त्याचे पर्यवसान शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत होते. यामुळे अल्पवयीन व किशोरवयीन मुली शिकार ठरत आहेत. म्हणजेच स्वातंत्र्याच्या नावाखाली हा स्वैराचार वाढत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्‍त करतात. 

त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या ‘प्रेम’ या विषयावर असलेले अवास्तव चित्रपट, प्रेमाच्या नावाखाली नायक- नायिकांचे चाललेले अश्‍लील चाळे याचाही परिणाम या पीढीवर होत आहे. अलीकडे मालिकाही याच कॅटेगरीमध्ये मोडत आहे. तसेच सहज मिळालेला स्मार्टफोन आणि त्यावर पॉर्न व्हिडिओ पाहण्यामुळे हे प्रमाण वाढत आहे. तसेच लैंगिकतेबद्दल अज्ञान यामुळे हे प्रमाण वाढत आहेत. 

बर्‍याचदा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण मुलींना गर्भधारणेविषयी अत्यल्प माहिती असते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाक डे असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात 1 ते 15 वर्षे वयोगटातील 89 मुलींनी गर्भपात केला आहे. तर 15 ते 19 वर्षे वयोगटातील 2 हजार 311 किशोरवयीन मुलींची संख्या इतकी आहे.

याचे विश्लेषण करायचे झाल्यास किशोरवयातील मुली तुलनेने इतर वयोगटातील मुलींपेक्षा जास्त अनुकरणप्रिय असतात. याबरोबरच चित्रपट, साहित्य, इतर माध्यमांचा त्यांच्यावरील प्रभाव तीव्र स्वरूपाचा असल्याने त्या प्रभावातून त्यातील विविधांगी गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा होते. तसेच यातून असुरक्षित लैंगिक संबंध येतो. त्यातून गर्भपाताला सामोरे जावे लागते. याशिवाय मैत्री, प्रेम, आकर्षण यांच्यातील फरक समजून घेण्यास त्या कमी पडतात. किशोरवयातील मुलींची समज, सभोवतालच्या परिस्थितीला ग्रहण करण्याची क्षमता, प्राप्त परिस्थितीचा त्यांनी घेतलेला नको तो अर्थ, यामुळे 15 ते 19 वयोगटातील आकडेवारीचा क्रम हा चढता आहे. गर्भपात प्रकरणाचा सामाजिक शास्त्राच्या पातळीवर अभ्यास केल्यानंतर ही बाब आढळून येत असल्याची माहिती ससून रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे यांनी दिली.