होमपेज › Pune › लाखो नेत्रांनी अनुभवला गोल रिंगण सोहळा 

लाखो नेत्रांनी अनुभवला गोल रिंगण सोहळा 

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:17AMइंदापूर/निमगाव केतकी : दिवाणराव देवकर/जावेद मुलाणी


आता कोठे जावे मन तुझे चरण देखलीया ।

भाग गेला शीण गेला अवघा झालासे आनंद ॥

या चरणाप्रमाणेच इंदापूरच्या गोल रिंगणामध्ये वारकर्‍यांचा उत्साह दिसून आला. वारकरी आणि ग्रामस्थांची अलोट गर्दी, एकाच तालात तल्लीन झालेले टाळकरी आणि पखवाजवादक अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोमवारी (दि. 16) इंदापूर येथे पार पडले.  नागवेलीच्या पानासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या  निमगावकरांचे आदरातिथ्य निरोप घेऊन पावसाच्या सरीत पालखी सोहळा इंदापूरकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर सोनमाथ्यावर सोनाई दूध संघाच्या वतीने सुगंधी दुधासह अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन गोखळीच्या ओढ्यातील विसावा घेऊन पालखी सोहळा लाखो वैष्णव भक्तांसह  इंदापूर येथे दाखल होताच राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह  इंदापूरकरांनी शाही स्वागत केले.  

रिंगणात प्रथम पताकावाले धावले, त्यानंतर  तुळशीवृंदावन व हंडा डोक्यावर घेतलेल्या महिला धावल्या. विणेकरी, पखवाजवादक, मेंढ्यांनीही धावा केला. त्यांनी प्रदक्षिणा घालत ग्यानबा-तुकारामच्या नामस्मरणात रिंगणात मोठ्या उत्साहात धावले. माजी मंत्री पाटील व गारटकर यांच्या हस्ते मानाच्या अश्वाची पूजा झाली. वरील प्रदक्षिणा पूर्ण होताच अश्वांचे रिंगण पाहण्यास आतुरलेल्या लाखो नेत्रांनी थोडी उसंत मिळताच अश्वांची  रिंगणात दौड चालू झाली. दोन्ही अश्वांनी तीन वेळा वार्‍याच्या वेगात जोरात दौड केली. हा सोहळा वारकर्‍यांनी ‘याचि देहा याचि डोळा’ आपल्या नयनात साठवून ठेवला.