Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › राज्यात शालेय पोषण आहारात ‘दूध पावडर’

राज्यात शालेय पोषण आहारात ‘दूध पावडर’

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 12:48AMपुणे : दिगंबर दराडे

राज्यात सरकारी व सहकारी संघांकडून 26 हजार मेट्रिक टन दूध पावडर तयार केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात साठा तयार झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पोषण आहारात शालेय विद्यार्थ्यांना पावडर देण्याचा प्रस्ताव राज्य शासनासमोर ठेवला असून या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंंबईत होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दै. ‘पुढारी’शी  बोलताना दिली.  

राज्यात काही ठिकाणी ऑगस्टपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी दूध संघ सक्षम असल्याने अतिरिक्त दुधापासून दूध पावडर, बटर आदी उपपदार्थांची निर्मिती केली जात आहे. मात्र ही पावडर अतिरिक्‍त प्रमाणात तयार होत आहे. परदेशात देखील या पावडरचे दर पडले आहेत. यामुळे या पावडरला फ ारशी मागणी नसल्याने ही पावडर शालेय पोषण आहारात देण्याच्या हालचाली राज्य शासनाच्या पातळीवर सुरु आहेत. 

प्रतिवर्षी सहकारी दूध संघाकडून एक हजार मेट्रिक टन पावडर तयार करण्यात येते. तर 25 हजार मेट्रिक टन खाजगी दूध संघाकडून पावडर तयार करण्यात येत आहे. सध्या राज्यात 40 हजार टन पावडर शिल्‍लक आहे. या पावडरचा जर शालेय पोषण आहारात वापर केला तर याच ठिकाणी मार्केट तयार होईल. यामुळे दूध उत्पादकांना देखील ‘अच्छे दिन’ येण्यास मदत होणार असल्याचे कुरंदरकर यांनी सांगितले. 

स्थानिक दूध अंगणवाडी व शाळांतून विद्यार्थ्यांना, गरोदर व स्तनदा माता यांना ‘अमृत आहार’ मिळण्यासाठी दूध पावडरीचा पुरवठा केला पाहिजे. याच बरोबर महिला बालकल्याण विभाग, आश्रम शाळा, सरकारी प्राथमिक शाळा येथे पोषण आहात पावडरचा उपयोग होऊ शकतो. राज्यात शाळा, अंगणवाडीत जाणार्‍या बालकांची संख्या पावणे तीन कोटी आहे. शिवाय गरोदर महिलांची संख्या साधारण पावणे पाच लाख आहे. शाळांमध्ये व अंगणवाडीत शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. या योजनेचा अवाढव्य खर्च रोखता येईल.यातून मार्ग काढण्यासाठी पोषण आहारात शालेय विद्यार्थ्यांना पावडर देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. 

पहिली ते आठवीचे विद्यार्थी ः 1 कोटी 60 लाख 
तीन वर्षांपर्यंतचे अंगणवाडीतील बालके ः 26 लाख 3 हजार 
3 ते 6 वयोगटातील बालके ः  26 लाख 61 हजार      
अंगणवाडीत जाणारी एकूण बालके ः  52 लाख 64 हजार 
शाळा, अंगणवाडी एकत्रित संख्या ः 2 कोटी 13 लाख 

दूध पावडर देणे हिताचे ठरेल

राज्यात सध्या दूध दराचा प्रश्‍न चव्हाट्यावर आहे. दर नसल्याने हतबल शेतकर्‍यांनी ‘मोफत’ दूध वाटण्याचे आंदोलन सुरू केले आहे. दूध दराचा प्रश्‍न सुटण्यासाठी दुधाला मागणी वाढायला हवी. मागणी वाढण्यासाठी राज्यातील शाळा, अंगणवाडीत पोषण आहारातून दूध पावडरचा पुरवठा करणे गरजेचे आहे, असे झाल्यास निश्‍चितपणे मुलांच्या आरोग्याला फायदा होईल.  - प्रा. फुलचंद चाटे, (शिक्षणतज्ञ).

ऑक्टोबरपासून दुधाच्या संकलनात वाढ

शासनाकडे यापूर्वी असलेली दूध पावडर विक्रीविना पडून आहे. तरीही शासन पुन्हा दूध पावडर तयार करण्यासाठी अनुदान देणार आहे. ऑक्टोबरपासून दुधाच्या संकलनात मोठी वाढ होते. त्यामुळे अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडविण्याकरिता शासनाने शालेय पोषण आहारात दुध पावडरचा उपयोग करणे हा उत्तम पर्याय राहील. शासनाने दुधाचे दर वाढविल्याने सहकारी दूध संघ अडचणीत सापडल्याने काही संघांनी शासन आदेश डावलून कमी दर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळावा, याकरिता शासनाने भुकटी प्रकल्पांना तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले.- सुहास लोणकर