होमपेज › Pune › एकबोटेंचा मुक्‍काम खास अंडासेलमध्ये..!

एकबोटेंचा मुक्‍काम खास अंडासेलमध्ये..!

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:54AMपुणे : विजय मोरे 

कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना येरवडा येथील कारागृहातील दाऊद गँग आणि नक्षलवादी कैद्यांकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी, कारागृह प्रशासनाने या कैद्यांपासून दूर असलेल्या  खास ‘अंडा सेल’मध्ये त्यांना ठेवले आहे.

कोरेगाव-भीमा येथे हिंसा भडकविल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटेंना 14 मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष असलेल्या एकबोटे हे नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहेत. यापूर्वीही त्यांची गेम करण्यासाठी अत्याधुनिक हत्यारासह चौघे अतिरेकी पुण्यात आले होते. मात्र, मुंबई पोलिसांना याची ‘भणक’ लागल्यानंतर त्यांनी  पुणे पोलिसांव्दारा एकबोटेंना सावध केले होते.

व आठवडाभर घराबाहेर पडू नका, असे त्यांना सांगण्यात आले होते. गेम करण्यासाठी आलेले अतिरेकी, चार दिवस एकबोटेंचा ठावठिकाणा न लागल्याने पुण्याबाहेर पडले.  त्यानंतर याच अतिरेक्यांनी ठाणे येथील एका गोरक्षक दलाच्या हिंदुत्ववादी नेत्याचा गोळ्या घालून खून केला होता. 

एकबोटे हे कट्टर हिदूत्ववादी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर राज्यभरात एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच एकबोटे हे दाऊद गँग व नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा पोलिस गुप्तचरांच्या अहवालात स्पष्ट म्हटलेले आहे. एकबोटेंना अटक झाल्यानंतर येरवडा कारागृह प्रशासनालाही कारागृहात इतर कैद्यांपासून एकबोटेंना धोका असल्याची गुप्तचरांनी माहिती दिली होती. येरवडा कारागृहात दाऊद गँगचा खतरनाक गॅगस्टर सलिम कुत्ता, दुबई येथील अली भाई यांना अंडासेल मध्ये ठेवलेले आहे. यांच्याच अंडा सेल शेजारील दुसर्‍या अंडा सेलमध्ये कट्टर नक्षलवादी बान्या नायर आणि भेलके यांना ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अंडासेलपासून दूर असलेल्या दुसर्‍या अंडासेलमध्ये हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई  याला ठेवण्यात आले आहे.

एकबोटे यांना सलिम कुत्ता, अलीभाई, भेलके आणि बान्या नायर या खतरनाक कैद्यांपासून धोका होऊ शकतो, म्हणून खरबदारीच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने एकबोटे यांना सुरक्षित अंडासेलमध्ये ठेवले आहे. एकबोटे यांना बरेच आजार असल्याने, कारागृह आरोग्य अधिकार्‍यांव्दारा विशेष तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत.

 

Tags : pune, pune news, Milind Ekbote, egg cell,