Mon, Aug 26, 2019 01:55होमपेज › Pune › मिलिंद एकबोटे पोलिस ठाण्यात हजर

मिलिंद एकबोटे पोलिस ठाण्यात हजर

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:53PMशिक्रापूर : वार्ताहर

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी आरोपी असलेले हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख मिलिंद एकबोटे हे शुक्रवारी (दि. 23) चौकशीसाठी शिक्रापूर पोलिस स्थानकात हजर झाले. 

सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला असल्याने एकबोटे यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले. 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. याच वेळी न्यायालयाने त्यांना पोलिसांत चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते.


मी निर्दोष; सत्य समोर येईल : मिलिंद एकबोटे

एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणात संशयित असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख मिलिंद एकबोटे  हे शुक्रावारी (दि. 23) चौकशीसाठी शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले. त्यानंतर एकबोटे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता, त्यांनी ’सत्यमेव जयते’ असे सांगत आपण निर्दोष असल्याचे व सत्य समोर येईल, असे सूचक विधान केले. याचवेळी त्यांनी आपण ‘जात्यात आहोत की सुपात’ अशी व्यथा व्यक्त केली.

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. याचवेळी न्यायालयाने त्यांना पोलिसात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एकबोटे हे आपले वकील व नातेवाईकांसह शिक्रापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी हजर झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले उपविभागीय आधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सुमारे चार तास एकबोटे यांची चौकशी केली. 

यानंतर माहिती देताना डॉ. पखाले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. यामुळे एकबोटे यांना गरज आहे तोपर्यंत चौकशीसाठी बोलाविले जाईल. या चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्याचे आदेश आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. एकबोटे हे तपासाला यायला तयार होते, परंतु आम्हाला त्यांची कोठडी हवी होती. ज्यामध्ये पुरावे तपासता आले असते. एकबोटे सापडत नव्हते. पोलीस त्यांना शोधत नव्हते. याबाबींमध्ये काहीही तथ्य नसल्याचे पखाले यांनी या वेळी सांगितले.