Tue, Mar 19, 2019 11:36



होमपेज › Pune › शेतीक्षेत्र ढासळल्याने शहरात स्थलांतर

शेतीक्षेत्र ढासळल्याने शहरात स्थलांतर

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:26AM



पुणे : प्रतिनिधी

शेतीमधून होत असलेली रोजगारनिर्मिती आणि त्यातील आर्थिक उत्पन्नाची साधनं अपुरी पडत आहे. शेतीक्षेत्र ढासळल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील काही वर्षांत पंजाबमधील दलित आणि तेलंगणामधील आदिवासी यांचे स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामागे शेतकरी आणि शेतमजूरविरोधी धोरणच कारणीभूत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे व्यक्‍त केले.

येथील द युनिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी त्यांच्यासह शेतमजूर युनियनचे नेते कुमार शिराळकर, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या हस्ते ‘ऊस तोडणी मजुरांचे स्थलांतरीत जगणं’ या पुस्तकाचे प्रकाशन व व्याख्याणांचा कार्यक्रम सोमवारी (दि.14) गोखले सभागृहात सायंकाळी झाला. यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनच्या संचालिकका मुक्ता कुलकर्णी, विवेक घोटाळे आदी उपस्थित होते.  

ते पुढे म्हणाले की, देशात 1991 नंतर आर्थिक विषमतेचे प्रमाण वाढत चालले आहे. 2001 पुर्वी ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण अधिक होते. तुलनेने ते 2011 नंतर ग्रामीणऐवजी शहरी भागात वाढल्याचे दिसून येत आहे. पुढे जावून हे प्रमाण स्थलतरांमुळे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता अधिक राहील, ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागातील तरुण वर्ग रोजगारांच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये येत आहे.  गेल्या काही वर्षात आंधप्रदेश, तेलंगनामधून महाराष्ट्रात स्थलांतरित होणार्‍या लोकांचे प्रमाण वाढले आहे.

भारतीय राज्य घटनेला बाजूला ढकलून श्रमिक वर्गासाठीचे कायदे नष्ट करण्याचे काम सध्या सुरु असल्याची टीका करुन शेतमजूर युनियनचे नेते कुमार शिराळकर म्हणाले की, “ श्रमिक वर्गात एकजुट नाही. शेतकर्‍यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. रोजगाराची हमी नाही, उपजीवीकेची साधन नाही, जमिनही नाही. त्यामुळे कर्जबाजारीपणाचे शेतकर्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी वेठबिगारांच्या हक्कासाठी देशातील कामगार संघटनांनी एकत्रित येवून शासनावर दबाव टाकल्यास काही तरी सुधारणा होईल.”

राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर म्हणाले, राज्याचा विचार केला तर सहकारातून सहकार वाढण्याऐवजी काही कुटूंबाच्या हातात सहकार गेल्यामुळे कुंटुंबाचेच सहकारावर वर्चस्व वाढले आहे. राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही. मात्र, ऊस पिकाखालील क्षेत्रात मागील 15 वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. शहराचं वाढते बकालीकरण, विविध विषयांवरील आंदोलनामुळे निर्माण झालेली अस्थिरता हे राजकीय अपयश आहे.