Tue, Jul 23, 2019 07:09होमपेज › Pune › प्रवासी घायकुतीला   

प्रवासी घायकुतीला   

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:49AMचाकण : वार्ताहर

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोशी (ता.हवेली) पासून पुढे चिंबळी फाटा, आळंदी फाटा, चाकण ते खेड तालुक्याच्या हद्दीसह उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्याने त्रस्त करीत आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे 29 किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (ता. खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली असली तरी रस्ते विकासासाठी लागणार्‍या परवानग्या, जमीन अधिग्रहण, जमीन अधिग्रहणातील अडचणी तत्काळ सोडवून रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

इच्छित स्थळी पोहचून तेथील कामाला लागणार्‍या वेळेपेक्षा तेथे जाण्याकरता प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेले काही वर्षे पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवासी अनुभवत आहेत. चाकण येथील चौक, आळंदी फाटा, चिंबळी फाटा, मोशी ते अगदी दापोडी पर्यंतचा भाग ही वाहतूक कोंडीची जणू केंद्रेच झाली आहेत. विशेष म्हणजे ही वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे होत आहे, याचा विचारच होत नसल्याची सामान्य नागरिकांची भावना आहे. ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, रस्त्याची दुर्दशा ही वाहतूक कोंडी होण्याची तसेच त्यात भर घालण्याची काही प्रमुख कारणे आहेत. परंतु यामुळे सामान्य प्रवासी, नोकरदार यांना कार्यालयात पोहोचताना आणि सायंकाळी या महामार्गाने प्रवास करताना नाकी नऊ येत आहेत. वाहतूक कोंडीत वरचेवर अडकून पडल्याने वाढलेला प्रवासाचा वेळ, नुकसान आणि त्यामुळे होणारा शारीरिक-मानसिक त्रास यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवासी सध्या घायकुतीला आले आहेत.  

चाकणमधील समस्या बिकट 

वाहनांची वाढलेली संख्या, रिक्षा व सहा आसनी रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहनचालक अशा विविध कारणांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. चाकण सारख्या भागात ही समस्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून पादचारी, दुचाकीस्वार आणि मोटार चालकांना पुणे-नाशिक महामार्गावरील विविध चौक ओलांडणे अक्षरशः जिकीरीचे होऊन बसले आहे. सततची वाहतूक कोंडी आणि अपघांतांमुळे आता मृत्यूचा सापळा अशी होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षात या महामार्गावर शेकडो अपघात झाले असून  त्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांना , रस्ता ओलांडणार्‍या पादचारी मंडळीना आणि दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जलदगतीने काम करण्याची गरज

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे 29 किलोमीटरपर्यंत लांबीच्या नाशिक फाटा ते चांडोली (ता. खेड) या रस्त्याच्या सहा पदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. या कामासाठी जवळपास एक हजार कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत हे काम सुरू होणार आहे. या रस्त्यामुळे भविष्यात पुणे-नाशिक महामार्गावरील दळणवळणाचा ताण कमी होऊन येथील वाहतूक व्यवस्था सक्षम होणार आहे.  मात्र सहापदरीकरणाचे काम सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने करण्याची नागरिकांची मागणी आहे.