Thu, Apr 25, 2019 23:53होमपेज › Pune › आयटी तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा

आयटी तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा

Published On: May 21 2018 1:35AM | Last Updated: May 21 2018 1:29AMपुणे : प्रतिनिधी

आयटी कंपनीत नोकरी करणार्‍या तरुणांनी एकत्र येऊन फ्लॅटमध्ये मद्यपान करून व्हीडिओ गेम खेळत मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून धिंगाणा घातला. ऐवढेच नव्हे तर त्यांनी आजूबाजूंच्या रहिवाशांच्या तक्रारीवरून घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस कर्मचार्‍याच्या कानशिलात लगावली.  पोलिस अधिकार्‍यांशी हुज्जत घालून प्रचंड गोंधळ घातला. हडपसर भागातील साडेसतरानळी परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.  दरम्यान, याप्रकरणी सहा  तरुणांना  अटक केली आहे.

अभिषेक विनकुमार जेमीणी (वय 24), चंदन दीपक भंडारी (वय 24), अमनदीप सुनीलकुमार शर्मा (वय 27), उत्कर्ष महाविर शर्मा (वय 24), राकेश शंभुदयाल शर्मा (वय 28), आणि रोहित हिरालाल वांगणू (वय 30, रा. अ‍ॅमनोरा व्हीक्ट्री टॉवर, साडेसतरानळी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई हनमंत दुधभाते (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वांगणू याचा साडेसतरानळी परिसरातील अ‍ॅमनोरा व्हीक्ट्री टॉवर या बहुमजली इमारतीत फ्लॅट आहे. रोहित वांगणूसह इतर पाच जण एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. शनिवारी रात्री सर्वजण रोहित याच्या फ्लॅटवर आले होते. त्यांनी मद्यपान केले. त्यानंतर व्हीडिओ गेम लावून खेळत बसले. परंतु, त्यानंतर त्यांनी मोठ-मोठ्याने आरडाओरड करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील रहिवाशांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फ्लॅटमध्ये मुले दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली. नियंत्रण कक्षाकडून हडपसर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार, हडपसर पोलिस ठाण्यातील बिट मार्शलवर असणारे फिर्यादी  हनमंत दुधभाते आणि त्यांचा सहकारी हे दोघेही घटनास्थळावर गेले.

सुरक्षा रक्षकाकडे विचारपूस केल्यानंतर त्याने 201 क्रमांकाचा फ्लॅट दाखवला. त्यावेळी हे तरुण गोंधळ घालत होते. त्यावेळी फिर्यादी दुधभाते यांनी त्यांना गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्यावर तरुणांना फिर्यादींना तुम्ही कोण सांगणारे आम्हाला, हा आमचा फ्लॅट आहे, असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तरुण ऐकत नसल्याने त्यांनी परत पोलिस ठाण्यात संपर्क करून वरिष्ठांना बोलावून घेतले. त्यावेळी रात्रपाळीवर असणारे सहायक निरीक्षक आदलिंग आणि इतर कर्मचारी तेथे गेले. त्यांनी तरुणांना गोंधळ थांबवण्यास सांगितले.  परंतु, तरीही तरुण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी पुन्हा गोंधळ घालत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेत, फिर्यादी पोलिस शिपाई हनमंत दुधभाते याच्या कानशिलात मारत कॉलर पकडून ते करत असणार्‍या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना पोलिस ठाण्यात नेले. तसेच, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असल्याची माहिती हडपसर पोलिसांकडून देण्यात आली.