Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Pune › ‘बे्रकडाऊन’वर ‘मिडीबस‘चा उतारा

‘बे्रकडाऊन’वर ‘मिडीबस‘चा उतारा

Published On: Jul 28 2018 1:39AM | Last Updated: Jul 28 2018 12:51AMपुणे : शहरातील अरुंद रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी प्रवाशांची ने-आण करण्यासाठी मिडीबसची खरेदी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र पीएमपीएमएलच्या ताब्यातील अनेक बसेस बे्रकडाऊन होत असल्यामुळे त्या मार्गावरील फेर्‍या पूर्ण करण्यासाठी चक्‍क मिडीबसचा वापर केला जात आहे. त्यामुळे जवळच्या प्रवासासाठी नागरिकांना रिक्षा व खासगी वाहनांना प्राधान्य द्यावे लागत आहे. परिणामी उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रयोग करणार्‍या पीएमपीएमएल महामंडळाला मिडीबसही अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही शहरांतील प्रवाशांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) ताफ्यात मार्चपासून 200 मिडीबसेस दाखल झाल्या आहेत. अरुंद रस्ते, गल्ली-बोळ, वाहतूक कोंडी परिसर तसेच प्रवासाचे जवळचे अंतरासाठी मिडीबसचा वापर करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

बसची आसनक्षमता 32 असून, दोन्ही शहरात वर्दळीच्या रस्त्यांवर बस धावण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यासाठी पीएमपीएमएलने 26 मार्ग निश्‍चित केले होते. मिडीबस दाखल झाल्यापासून पहिल्या टप्प्यात नेमून दिलेल्या मार्गावर बसची वाहतूक सुरळीत होती. त्यामुळे विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी बस प्रवासाला प्रतिसाद दिला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पीएमपीएमएल आणि ठेकेदारांच्या ताब्यातील बसेसचे ब्रेकडाऊन प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दिवसाला सरासरी 165 बसेस रस्त्यांवर बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे; तसेच ब्रेकडाऊन वाढल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दूरच्या अंतरावर बसफेर्‍या करण्यासाठी चक्क मिडीबसचा वापर केला जात आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या 26 मागार्र्ंवर मिडीबसचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी इच्छितस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना मिडीबसची तासन्तास वाट पाहावी लागत आहे. विशेषतः सासवड, उरुळी कांचन मार्गावर मिडीबस चालविल्या जात आहेत. ऐन पावसाळ्यात महामंडळाकडून मिडीबसची फिरवाफिरवी आणि धोरणानुसार मिडीबसच्या फेर्‍या पूर्ण न करता इतर मार्गांवर बस चालविली जात असल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

पीएमपीएमएल आणि ठेकेदारांच्या ताब्यातील बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहे. त्यामुळे संबंधित मार्गावर प्रवाशांच्या रोषापासून वाचविण्यासाठी मिडीबस उपलब्ध केल्या जात आहेत. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी महामंडळ आणि ठेकेदारांनी बसची देखभाल, दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, लक्ष न दिल्यामुळे महामंडळाला मिडीबस पर्यायी मार्गाने फिरवावी लागत आहे. पीएमपीएलच्या 50 गाड्या स्क्रॅप केल्यामुळे संबंधित मार्गावर बसफेर्‍या पूर्ण करण्यासाठी मिडीबसचा वापर केला जात आहे. नवीन बस महामंडळाकडे दाखल झाल्यानंतर पुन्हा मिडीबस रूटप्रमाणे चालविण्यात येणार असल्याचे पीएमपीएमएलच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.