Tue, Jul 23, 2019 19:05होमपेज › Pune › वर्षभरात पिंपरीत मेट्रोचे काम सुसाट

वर्षभरात पिंपरीत मेट्रोचे काम सुसाट

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 25 2017 12:56AM

बुकमार्क करा

पिंपरी : मिलिंद कांबळे 

पुणे मेट्रोचे काम पुणे शहरापेक्षा पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत वेगात सुरू आहे. शहरातील 7.20 किलोमीटर अंतराच्या मार्गावर एकूण 56 फाउंडेशन व 16 पिलर उभे आहेत. पुणे मेट्रोच्या कामाच्या भूमिपूजनास एक वर्षे पूर्ण होत असल्याने शहरासाठी ही कामगिरी नक्कीच डोळ्यात भरणारी आहे.  

पुणे मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला रेंजहिल्स, खडकी येथील सिंचन मैदान येथे झाले. प्रत्यक्ष कामास एप्रिल-मे महिन्यात सुरुवात झाली. पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गावर पहिल्या टप्प्यात काम सुरू झाले. त्यातही शंकरवाडी, कासारवाडी ते खराळवाडी मार्गावरील काम प्रथम हाती घेण्यात आले. पाठोपाठ कासारवाडी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत काम सुरू केले गेले. 

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील ग्रेडसेपरेटरच्या एक्स्प्रेस मार्गावर मेट्रोचे पिलर उभारणीचे काम दिवसरात्र सुरू आहे. पिंपरी ते रेंजहिल्स मार्गावर प्रत्येकी 30 मीटरवर एक असे एकूण 288 पिलर (क्रमांक 100 ते 388) उभारले जाणार आहेत. त्यांतील एकूण 182 पिलर उद्योगनगरीत उभे राहतील. प्रकल्पातील पहिला पिलर शंकरवाडीत जुलैच्या अखेरीस उभा राहिला.

आतापर्यंत एकूण 56 फाउंडेशन तयार झाले असून, एकूण 16 पिलर उभे राहिले आहेत, तर खराळवाडी येथे 14 डिसेंबरला पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला ‘डक्ट  सेगमेंट’ बसविण्यात आला. सर्व डक्ट बसविल्यानंतर मेट्रोचे लोखंडी रूळ बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे.  मेट्रोचा पहिला पिलर उभारण्याचा मानही उद्योगनगरीस मिळाला आहे;  तसेच मेट्रोचे पहिले स्थानक उभारणीचे काम वल्लभनगर येथे सुरू झाले आहे. वल्लभनगर व आयटी टॉवर्स येथे स्थानकाचे प्रवेशद्वार उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. 

मेट्रोची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून मेट्रोची माहिती देणारे ‘सहयोग केंद्र’ पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर एसटी आगारात सुरू करण्यात आले आहे. कामात अडथळा ठरणार्‍या झाडांचे पुनर्रोपण केले जात आहे; तसेच आकुर्डी येथील मेट्रो उद्यान येथे शेकडो झाडे लावली आहेत. कामामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक संथ झाली आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी 4 प्रशिक्षित जवानांचे शीघ्र कृती दलाचे पथक तैनात केले आहे; तसेच वाहतूक नियंत्रणासाठी 16 ट्रॅफिक मार्शल हातात लाल झेंडा घेऊन कार्यरत आहेत. 

प्रशस्त रस्त्यामुळे काम वेगात

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त असल्याने उद्योनगरीत विनाअडथळा मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. महापालिका प्रशासनासह वाहतूक पोलिस व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद  मिळत असल्याने काम वेगात सुरू आहे. सर्व काम 2019पूर्वी पूर्ण केले जाईल.  वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून सर्व दक्षता घेण्यात येत आहेत, असे पिंपरी-रेंजहिल्स मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख सुनील म्हस्के यांनी सांगितले. 

निगडीपर्यंतच्या मेट्रो मागणीस वेग

पहिल्या टप्प्यात पिंपरीऐवजी निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रोचे काम करण्याच्या मागणीने वेग धरला आहे. त्या वाढीव कामाचा डीपीआर मेट्रोकडून केला जात आहे. त्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. सदर कामाचा 600 ते 800 कोटींचा खर्च महापालिका स्वत: करण्यास तयार असून, आवश्यकता भासल्यास विविध मार्गाने निधी उभारण्यात येईल, असे महापालिकेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रोच्या कामाची चर्चा जोरात आहे.