Sun, May 26, 2019 11:44होमपेज › Pune › मध्यवस्तीत मेट्रोला बसणार ‘खो’

मध्यवस्तीत मेट्रोला बसणार ‘खो’

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 12:58AMपुणे : ज्योती भालेराव

शहरातील विस्तारित भागात मेट्रोचे काम झपाट्याने सुरु असलेले दिसत असले तरी मध्यवर्ती भागात या प्रकल्पाला ‘खो’ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योग्य मोबदला मिळत नसल्याने आणि विश्‍वासात घेतले जात नसल्याच्या मुद्द्यावर कसबा पेठेतील 250 रहिवाशांनी मेट्रोविरोधात दंड थोपटले आहेत. 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) प्रकल्पाच्या मार्गावरील बाधित लोकांचे सर्वेक्षण केले आहे. कसबा पेठेतील झांबरे चावडी रस्त्यानजीक मेट्रो स्टेशनचे नियोजन आहे. मात्र, मुळातच दाटीवाटीची घरे आणि दुकानांचा परिसर असणार्‍या या भागात स्टेशन प्रस्तावित करताना स्थानिकांना विश्‍वासात न घेतल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांनी जमिनी देण्यासाठी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. 

आम्हाला फसवू नका

जानेवारी 2018 पासून मेट्रो मार्गातील बाधित जागांची माहिती गोळा करण्यास महामेट्रोने सुरूवात केली. मात्र नागरिकांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रकल्पाचा पूर्ण नकाशा दाखवला जात नाही. स्टेशन कोठे होणार आहे, हे देखील इतके दिवस उघडपणे सांगण्यात आले नाही. त्यामुळे येथील बाधितांनी सर्वेक्षणासाठीचा फॉर्मही भरून देण्यास नकार दिला आहे. 

प्रकल्पाला विरोध नाही... पण?

आमचा प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प राबविला जात असताना कमीत कमी नुकसान व्हावे, अशी आमची मागणी असल्याचे काही बाधितांनी सांगितले. फडके हौद चौक अरुंद असून, तेथे कायमच वाहतुकीची कोंडी असते. अशात येथे स्टेशन झाल्यास कोंडी आणखी वाढणार आहे. त्यामुळे कमीत कमी जागा वापरून केवळ भुयारी मार्ग करावा; किंबहूना याच्याच पुढे महानगरपालिकेच्या बंद असलेल्या आठ नंबरच्या शाळेच्या जागेत स्टेशन होऊ शकते. यामुळे दोन्ही हेतू साध्य होतील, असा पर्यायही या बाधितांनी सुचविला आहे.

मेट्रो स्टेशनसाठी 60 गुंठे कशासाठी?

वास्तविक या ठिकाणी मेट्रोचा भुयारी मार्ग होणार आहे; मात्र, यासाठी 16 गुंठे जागेची गरज असताना महामेट्रोकडून 60 गुंठे जागेचा कब्जा घेण्यात येत आहे. वर्षानुवर्षे व्यापार करणार्‍यांना हटवून, येथे स्टेशनवर व्यापारी संकुल बनवून नवीन व्यापार्‍यांना संधी देण्याचा घाट घातला जात असल्याची शंका येथील नागरिकांना आहे. याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने हा संशय बळावला आहे. त्यामुळे प्रकल्पच काय तर सर्वेक्षणासाठी कोणतेही सहकार्य केले जाणार नसल्याची भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.