Sat, May 25, 2019 23:15होमपेज › Pune › रेल्वे स्थानकावर मेट्रो स्टेशन

रेल्वे स्थानकावर मेट्रो स्टेशन

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 10:52PMपिंपरी : प्रतिनिधी

कासारवाडीतील नाशिक फाटा व खडकी येथील मेट्रोच्या दोन स्टेशनवरून थेट रेल्वे स्थानकावर ये-जा करता येणार आहे. त्या दृष्टीने मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे व मेट्रोच्या प्रवाशांचा वेळ वाचून पर्यायी वाहतूक सुविधेचा वापर करता येणार आहे.  

स्वारगेट ते पिंपरी मार्गावर पहिल्या टप्प्यात पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा चौक, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी व रेंजहिल्स ही 9 मेट्रो स्टेशन आहेत. पिंपरी, खडकी व रेंजहिल्स वगळता उर्वरित सर्व 6 स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. पिंपरी-चिंचवड विभागाच्या वल्लभनगर एसटी आगारासमोरील संत तुकारानमगर स्टेशनचे पिअर आर्मचे काम 20 दिवसांपूर्वी सुरू झाले आहे. नाशिक फाटा चौकातील मेट्रोचे स्थानक रेल्वे व बीआरटीएस बस सेवेसोबत जोडले जाणार आहे. मेट्रो स्टेशनवरून कासारवाडी व खडकी रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यासाठी ‘इन-आऊट गेट’ असणार आहे. येथील सीएएफव्हीडी मैदानाशेजारील संरक्षण विभागाच्या जागेत वाहनतळ विकसित केले जाणार आहे. 

यासंदर्भात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या अधिकार्‍यांशी बोलणी झाली असून, त्यांनी त्या कामास तत्वत: मंजुरी दिली आहे. कासारवाडी व खडकी ही मेट्रोची दोन्ही  स्टेशन तेथील रेल्वे स्थानकाशी जोडल्याने रेल्वे प्रवाशांना मेट्रोचा वापर करणे अधिक सुलभ होणार आहे. भविष्यात पुणे ते लोणावळा लोहमार्ग चारपदरी होणार आहे. त्यावेळेस उपनगरी लोकलच्या फेर्‍यात वाढ होणार आहे. लोकल व मेट्रोने प्रवास करणे नागरिकांना सोईचे ठरणार असल्याचा दावा मेट्रोने केला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्टेशन रेल्वेला ‘कनेक्ट’ असणार आहे. नाशिक फाटा चौकात मेट्रो, रेल्वे, बीआरटीएस, एसटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी ‘मल्टी मोर्डल ट्रान्स्पोर्ट हब’ निर्माण केले जाणार आहे. खडकीतही मेट्रो स्टेशनवरून रेल्वे प्लॅटफार्मवर ये-जा करण्याची सोय असणार आहे. तसेच, शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानक येथेही मेट्रो व रेल्वेसोबत समन्वय असणार आहे. स्टेशन बांधण्यास मध्य रेल्वेने प्राथमिक  मान्यता दिली आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे रिच वन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी  दिली.

बोपोडीत काम करण्यास पुणे पालिकेची मान्यता

बोपोडीत मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यास पुणे महापालिका व वाहतूक पोलिसांनी  मान्यता दिली आहे. बोपोडी ते खडकी रेल्वे फाटकापर्यंतच्या कामास लवकरच सुरूवात केली जाणार आहे. मात्र, बोपोडी सिग्नल चौकात खडकी बाजारहून औंधच्या दिशेने जाणारा ग्रेडसेपरेटर मार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामुळे तेथे कामास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.