Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Pune › चार मार्गांवर धावणार मेट्रो 

चार मार्गांवर धावणार मेट्रो 

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:42AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील आणखी चार मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी सर्वेेक्षण करून, त्यांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनला (महामेट्रो) दिले आहे. या प्रस्तावित चार मार्गांमध्ये, मंडई ते सिंहगड रस्ता (भुयारी), रामवाडी ते खराडी विस्तारित मार्ग, हडपसर ते मुंढवा आणि खराडी मार्ग, तसेच डेक्कन ते कोरेगाव पार्क यांचा समावेश आहे. या मार्गांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळाल्यास शहरात मेट्रोचे जाळे निर्माण होऊ शकणार आहे. 

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात आता कात्रजपर्यंत मेट्रोसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात स्वारगेटपर्यंतची मेट्रो कात्रजपर्यंत जाणार आहे. मात्र, या दोन मार्गांव्यतिरिक्त आता आणखी चार मागार्र्ंवर मेट्रोची चाचपणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे तसेच भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी स्वारगेट ते सिंहगड रस्ता या मार्गावर मेट्रोची मागणी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्याचबरोबर वनाज ते रामवाडी मार्ग खराडीपर्यंत वाढविण्याची मागणीही या भागातील लोकप्रतिनिधींनी केली होती.

या मागण्यांची दखल घेत तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी या चार मागार्र्ंवर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी सर्वेेक्षण करून, त्याचा प्रकल्प अहवाल सादर करण्यासंबधीचे पत्र महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांना 4 एप्रिल रोजी दिले असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी येणारा सर्व खर्च पुणे महापालिका करेल, असेही आयुक्तांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वेेक्षणाबाबत महामेट्रोकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नसल्याने पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

स्वारगेट व डेक्कनला मार्ग जोडावेत

हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग पीएमआरडीए करणार आहे. त्यामुळे अन्य मार्गांसाठी महामेट्रोने पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही आयुक्तांनी केली आहे. आयुक्तांनी महामेट्रोला दिलेल्या पत्रात नवीन विस्तारित मार्ग हे स्वारगेट आणि डेक्कन भागांना जोडतील, असे असावेत अशी सूचना केली आहे.