Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Pune › नाशिक फाटा चौकात मेट्रोचे ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’

नाशिक फाटा चौकात मेट्रोचे ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:39AMपिंपरी : मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड शहराच्या दक्षिण व उत्तर विभागास जोडणार्‍या कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब’ विकसित केले जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मेट्रो, एसटी., पीएमपीएल बस, लोकल-रेल्वे आणि खासगी रिक्षा व टॅक्सी उपलब्ध होणार आहे. हे उद्योगनगरीतील पहिले अद्ययावत एकत्रित प्रवासी वाहतूक स्थानक ठरणार आहे. 

नाशिक फाटा चौकात भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूल आहे. पुणे-मुंबई जुना महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-लोणावळा लोहमार्ग, पवना नदी ओलांडून जाणारा हा भव्य असा दुमजली पुल आहे. या चौकातच रेल्वे कासारवाडी स्टेशन आहे. तर, दापोडी-निगडी बीआरटीचे नाशिक फाटा बस थांबा आहे. तसेच, भोसरी-पिंपळे गुरव उड्डाणपुलावर  नाशिक फाटा चौक ते किवळे बीआरटी मार्गाचा नाशिक फाटा बसथांबा आहे. भविष्यात बीआरटी मार्ग भोसरीतून मोशीपर्यंत नेण्यात येणार आहे. पुणे- नाशिक एसटी बसचा थांबाही चौकात आहे.

प्रवासी खासगी वाहतुक करणार्‍या रिक्षा व टॅक्सीचा थांबाही येथे आहे.  याच चौकातून पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग जात आहे. तसेच, भविष्यात नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाचेही नियोजन आहे. या सर्व सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रिकरणासाठी ‘मल्टिमोडल टॉन्सपोर्ट हब’ तयार केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना लोकल, बस, एसटी, रिक्षा व टॅक्सी आदी वाहने एकाच ठिकाणच्या स्थानकावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आणलेल्या वाहनांसाठी सुसज्ज वाहनतळही असणार आहे. 

मल्टिमोडल हबची निर्मिती महामेट्रो करणार आहे. कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस मेट्रोचे नाशिक फाटा स्टेशन उभे होईल. हे स्टेशन दुमजली असणार असून, पहिल्या मजल्यावर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुल असणार आहे. दुसर्‍या मजल्यावर वातानुकुलीत मेट्रो स्टेशन आहे. हे स्टेशन लोकल, एसटी, बीआरटी बस, रिक्षा व टॅक्सीचे थांब्यांनी जोडले जाईल. या सर्व यंत्रणाशी मेट्रोकडून समन्वय साधण्यात येत आहे. त्यास पालिकेनेही सहमती दिली आहे. त्यामुळे वाहतुक अधिक सुरक्षित व वेगवान होऊन, वेळ व पैश्यांची बचत होणार आहे. भविष्यात पवना नदीतून जलवाहतूक सुरु झाल्यास त्याचाही हबमध्ये समावेश केला जाणार आहे.