Tue, Apr 23, 2019 23:50होमपेज › Pune › मेट्रोचे प्रतीक्षित माहिती केंद्र लवकरच सुरू 

मेट्रोचे प्रतीक्षित माहिती केंद्र लवकरच सुरू 

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 11 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, शहरात धावणारी मेट्रो कशी असणार आहे हे समजावे यासाठी महामेट्रोतर्फे माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. संभाजी उद्यानाजवळील दोन गुंठे जागेत तयार होणारे हे माहिती केंद्र 15 अ‍ॅागस्टपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. या जागेत मेट्रो बोगीच्या प्रतिकृतीचे माहिती केंद्र उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकांची कामे वेगात सुरू आहेत. या प्रकल्पाची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी महामेट्रोने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी माहिती केंद्र उभारण्याचे निश्चित केले होते. नागपूरच्या धर्तीवर शहरातील मध्यवर्ती भागातील जागा या माहिती केंद्रासाठी मिळावी, अशी मागणी महामेट्रोच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेकडे केली होती. प्रारंभी संभाजी उद्यान आणि पेशवे पार्कमधील जागा महामेट्रोकडून मागण्यात आली होती. पण ती जागा देण्यास महापालिकेने नकार दिला होता. त्यानंतर संभाजी उद्यानातील दोन गुंठे जागा तीन वर्षांच्या कराराने महामेट्रोला देण्यासंदर्भात महापालिकेने मान्यता दिली. त्यामुळे वर्षभराच्या प्रतिक्षे नंतर हे केंद्र साकारण्यात येत आहे. सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती पुणेकरांना मिळावी, तसेच नागरिकांच्या शंकांचे निराकारण होण्यासाठी हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने ही वर्दळीच्या ठिकाणची जागा निवडली आहे. 

असे असेल माहिती केंद्र 

मेट्रो बोगीच्या आकारात साकारण्यात येणार्‍या या माहिती केंद्रात मेट्रो बाबतची माहिती, व्हिडीओ, ऑडिओच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मेट्रो संदर्भातील सर्व शंकांचे निरसन एका ठिकाणी मिळणार असून, हे केंद्र सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या ठिकाणी मेट्रो बोगी प्रमाणे बैठक व्यवस्था, सरकते दरवाजे आणि 25 डिग्री तापमान राखणारी व्यवस्था असल्याने नागरिकांना खर्‍या खुर्‍या मेट्रो प्रवासाचा आनंद देण्याचा प्रयत्न महामेट्रोकडून होणार आहे