Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Pune › ‘मेट्रो’चे पिलर

‘मेट्रो’चे पिलर

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:01PMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे मेट्रोचे मोरवाडी, पिंपरी ते दापोडी हॅरिस पुलापर्यंत काम वेगात सुरू आहे. हॅरिस पुलाखालील मुळा नदीपात्रात दोन पिलर उभारण्याचे काम सुरू असून, फाउंडेशन तयार झाला आहे. आतापर्यंत तेथील 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील खराळवाडी ते शंकरवाडीपर्यंत मेट्रोचे काम सुरू झाले आहे. खराळवाडी येथील 11 पिलरवर सेगमेंट गर्डरची जुळणी पुर्ण झाली आहे. गर्डर जुळणीचा कामाला सध्या वेग आला आहे. 

दुसर्‍या टप्प्यात कासारवाडी ते दापोडीपर्यंत काम सुरू आहे. कासारवाडीतील नाशिक फाटा चौकात स्टेशन व मार्गिका तयार करण्यासाठी तेथील सुमारे 50 झाडांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे. कासारवाडी येथील भुयारी मार्गाजवळ बीआरटीएस मार्गात मेट्रो पिलर उभारणीसाठी पॉयलिंगचे काम सुरू आहे. दापोडी येथील ब्रिटीशकालीन हॅरिस पुल व नव्या पुलामध्ये असलेल्या 2.3 मीटर अंतराच्या फटीमध्ये मेट्रोचे पिलर उभाण्यात येत आहेत. मुळा नदीच्या दोन्ही काठावर पिलर उभारणीचे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. पुलाच्या पिलरला धक्‍का लागू नये म्हणून येथील पाया इंग्रजी अक्षर ‘एच’प्रमाणे घेण्यात आला आहे. त्यासाठी मायक्रो पॉयलिंग पद्धतीचा अंवलब केला आहे.  दोन्ही बाजूचे फाउंडेशन (पाया) पूर्ण झाला आहे. त्यावर आता पिलर उभारण्यात येणार आहेत. नदी काठच्या दोन ठिकाणी फाउंडेशनचे काम झाल्याने पावसाळ्यात तेथे पिलरचे काम करता येऊ शकेल, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. 

तसेच, मुळा नदी पात्रात एकूण 5 पिलर उभे केले जाणार आहे. प्रत्यक्ष नदी पात्रात केवळ 3 पिलर असणार आहेत. दोन पिलर हे नदीकाठावर आहेत. त्यांची उंची सर्वांधिक 22 ते 25 मीटर इतकी असणार आहे. नदी पात्रातील तीन पिलरचा काही भाग पाण्यात, काही भाग पाण्याबाहेर आणि काही भाग हॅरिस पुलाचा वर असणार आहे. पिलरची ही उंची पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गावरील सर्वांधिक असणार आहे. या कामासाठी हॅरिस पुलाजवळील झाडांचे स्थलांतर करण्यात येत असून, तेथील माती हटविण्यात येत आहेत. तसेच, येथे एका कंपनीतर्फे बसविण्यात आलेले घड्याळही हटविण्यात आले आहे. 

समांतर पुलाच्या कामास मेट्रोचे अडथळा नाही

दापोडीतील मुळा नदी पात्रात मेट्रोचे पिलर उभारणीचे काम वेगात सुरू आहे. पिंपरी पालिकेच्या वतीने हॅरिस पुलास समांतर दोन पुलाचे काम सुरू आहेत. त्यांच्या कामास अडथळा निर्माण न करता आमचे काम सुरू आहे. पूर्वी नदीपात्राकडेच्या दोन पिलरची बांधणी केली जात आहे. सुमारे 20 टक्के काम पुर्ण झाले आहे, असे महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.