Wed, Sep 26, 2018 20:01



होमपेज › Pune › महिलेस साखळदंडाने बांधून कोंडले

महिलेस साखळदंडाने बांधले, मारले; पोलिस गप्प

Published On: Dec 27 2017 10:25AM | Last Updated: Dec 27 2017 11:33AM

बुकमार्क करा




मडगाव : प्रतिनिधी

मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या आपल्या सख्ख्या वयोवृद्ध बहिणीला लोखंडी साखळीने जनावराप्रमाणे कुलूप लावून बांधून ठेवणार्‍या भावाचा प्रताप मंगळवारी कुडतरी मतदारसंघात समोर आला.

भावाच्या जाचातून सुटलेल्या आणि पायात लोखंडी साखळी आणि कुलूप घेऊन रस्त्यात फिरणार्‍या असहाय महिलेच्या सुटकेसाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकालाच शिवीगाळ करून सर्वांसमक्ष तिला रस्त्यातच मारहाण करून घेऊन जाणार्‍या भावावर पोलिस कोणतीच कारवाई करू न शकल्याने पोलिसांच्या असहायतेबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

पायात लोखंडी साखळी अडकवलेल्या स्थितीतील पन्नास ते पंचावन्न वर्षे वयाची महिला रामनगरी भागात रस्त्यावरून फिरत असल्याचे मंगळवारी आढळून आले. मडगाव भागात कामाला जाणार्‍या लोकांनी हा प्रकार पाहून महिलेची विचारपूस केली असता आपण याच भागात राहात असल्याचे तिने सांगितले. भूक लागली म्हणून आपण साखळी घेऊन बाहेर पडले, अशी माहिती तिने लोकांना दिली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने काही लोकांनी तिचे फोटो घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केले. काहींनी मायणा कुडतरी पोलिस, स्वयंसेवी संघटनांचे सदस्य तसेच पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

सदर महिला लोखंडी साखळी पायात अडकवलेल्या अवस्थेत भगवती टाईल्सजवळील जंक्शनवर बसून असल्याची माहिती स्थानिकांनी मायणा कुडतरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आलविटो रॉड्रिग्ज घटनास्थळी चौकशीसाठी दाखल झाले. त्यावेळी स्वयंसेवी संघटनेच्या सदस्या हिना शेख  यासुद्धा त्या ठिकाणी आल्या. शेख यांनी त्या महिलेची चौकशी केली असता ती नातलगांच्या तावडीतून पळून आल्याचे समोर आले. तिच्या एका पायात मोठी लोखंडी साखळी अडकवून एका टोकाला कुलूप लावण्यात आले होते.

पोलिस उपनिरीक्षक रॉड्रिग्ज हे तिची चौकशी करत असताना काळ्या जीपमधून आलेल्या तिच्या भावाने अचानक येऊन तिला रस्त्यावर आडवे पाडून मारहाण करून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. रॉड्रिग्ज यांनी तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तू मध्ये पडू नकोस, हा आपला कौटुंबिक प्रश्न आहे, असे सांगून त्याने उपनिरीक्षकांना सर्वांसमक्ष अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली. याच दरम्यान पोलिस उपनिरीक्षक रॉड्रिग्ज यांनी जीपचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने दाद न देता तशीच गाडी पुढे नेल्याने पोलिस उपनिरीक्षक गाडीखाली पडता पडता बालंबाल बचावले.

स्वयंसेवी संघटनेच्या सदस्या हिना शेख यांनी पोलिसांशी झालेल्या वर्तणुकीविषयी आश्चर्य व्यक्त केले. असहाय महिलेवर अत्याचार करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी आणि त्या महिलेची सुटका करावी, अशी मागणी हिना शेख यांनी केली आहे. सायंकाळपर्यंत याप्रकरणी तक्रार पोलिस स्थानकात नोंद झाली नव्हती. पोलिस निरीक्षकांना विचारले असता तक्रार देण्यास कोणीच आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.