Thu, Nov 22, 2018 16:57होमपेज › Pune › मानसिक विकृती मुलांसाठी घातक

मानसिक विकृती मुलांसाठी घातक

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:22AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

सध्याची बदलती जीवनशैली, धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे नसलेला वेळ या बाबी कुटुंबपद्धतीवर तर परिणाम करतच आहेत. मात्र, त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवरही होत आहे. मुलांना असलेले अनावश्यक गोष्टींचे आकर्षण, त्यांच्या आजूबाजूचा परिसर, पैसा, हायप्रोफाईल गोष्टींची ओढ यामुळे मुलांमध्ये मानसिक विकृती निर्माण होते. परिणामांची भीती व गांभीर्य नसल्याने ते गुन्हेगारीकडे वळतात.  

पालक आणि पोलिसांसमोर या गुन्हेगारी जगतात दाखल होणार्‍या नव्या पिढीला ताळ्यावर आणण्याची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांकडे 14 ते 18 वयोगटातील मुलांवर दाखल असलेले गुन्हयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आकडेवारीनुसार खून,खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शहरातील 14 ते 18 वयोगटातील मुलांचे प्रमाण वाढलेले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवर दाखल गुन्ह्यांच्या बाबतीत पुणे शहराचा देशात तिसरा क्रमांक लागतो.

हिंसक विकृतीत वाढ 

मुलं आसपासच्या वातावरणातून आत्मसात करत असतात. त्यांच्यापुढे येणारे चित्रपट, गल्लीबोळातील तथाकथित डॉन यांचे अनुकरण सहज मुले करत असतात त्यामुळे त्यांच्यात हिंसकता वाढत चालल्याचे निष्कर्ष अनेक सर्वेक्षणांतून निघाले आहेत. बालकांनी गुन्हा केल्यानंतर त्यांना सुधारगृह किंवा निरीक्षणगृहात त्याचे पुनर्वसन करण्यासाठी आणि गुन्हेगारी वृत्तीपासून दूर नेण्यासाठी पाठवले जाते. 

पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे 

मुलांच्या जडणघडणीवर आई वडीलांचे लक्ष असणे गरजेचे आहे.  आपला मुलगा वाईट संगतीकडे वळला आहे. किंवा त्याच्या वागण्यात काही वाईट सवयी दिसल्या तर पालकांनी वेळीच मुलाला बालकल्याण समितीकडे नेऊन  किंवा चांगल्या समुपदेशकाकडे नेऊन प्रबोधन केल्यास उचित राहील. बालसुधारगृहात गेल्यानंतर त्याचे प्रबोधन करण्यापेक्षा वेळीच त्याला पायबंद म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे केल्यास उत्तमच. - झायद सय्यद, सामाजिक कार्यकर्ता, रिसोर्स सेल फॉर जुवेनाईल जस्टिस