होमपेज › Pune › ‘झेडपी’त ‘राष्ट्रवादी’ सदस्यांची उपेक्षा

‘झेडपी’त ‘राष्ट्रवादी’ सदस्यांची उपेक्षा

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:38AMपुणे ः दिगंबर दराडे

पुणे जिल्हा परिषदेची सत्‍ता राष्ट्रवादीच्या हातात आहे; मात्र या ठिकाणी त्यांच्याच सदस्यांना अधिकार्‍यांकडून दुय्यम वागणूक देण्यात येत असल्याचे वास्तव जिल्हा परिषदेत समोर आले आहे. 

राज्यात भाजपच्या हाती सत्‍ता आली. यानंतर अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. मात्र, याला पुणे जिल्हा परिषद अपवाद  ठरली आहे. अजित पवारांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर एक हाती सत्‍ता मिळण्यास राष्ट्रवादीला यश आले. 60 पेक्षा अधिक सदस्य या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या पुढाकारातून निवडून आले. मात्र, या ठिकाणी त्यांच्याच सदस्यांना दुटप्पी वागणूक मिळत आहे. यावरून जिल्हा परिषदेतील अधिकारी नागरिकांना कसा मेळ लागू देणार या विषयी एकच चर्चा आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगू लागली आहे. 

सोमवारी अधिकारी व पदाधिकारी भेटतील म्हणून नागरिक संपूर्ण जिल्ह्यांतून येतात. या नागरिकांना अधिकारी भेटत नाही म्हणून वांरवार तक्रार होते. मात्र बैठकीच्या नावाखाली अधिकारी वेळ मारुन नेण्यामध्ये आघाडी घेतात. पदरी निराशा आलेले नागरिक मोकळ्या हाती घरी परतात. मात्र आज याचा प्रत्यय पदाधिकार्‍यांना आणि सदस्यांना घ्यावा लागला. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्यासाठी बारा वाजल्यापासून सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्हा परिषद सदस्य अधिकार्‍यांच्या केबिनबाहेर चकरा मारत होते. मात्र तरी देखील या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी टाळत असल्याचे वास्तव या सदस्यांनी दै.‘पुढारी’कडे मांडले.

एकेकाळी राज्यात सत्‍ता असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांचा खूप दरारा असल्याचे वास्तव या जिल्हा परिषदेने अनुभवले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आल्याच्या आठवणीदेखील सांगण्यात येत आहेत. मात्र आता निधी तर सोडाच पण अधिकारीदेखील सदस्यांना भेटत नसल्याने नेमका हा बदल का झाला असावा असा प्रश्‍न सर्वसामान्यांसमोर आला आहे. मागील एक वर्षापासून पुणे जिल्हा परिषदेला निधीपासून वंचित रहावे लागत आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना पुणे जिल्हा परिषद राज्यात निधीबाबतीत आघाडीवर होती. मात्र राज्यातील सत्‍ता गेली आणि निधीवर त्याचा परिणाम झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन आमदारकी मिळविणारे नेते याच जिल्हा परिषदेेने दिले आहेत. मात्र याच जिल्हा परिषदेतील सदस्यांची होणारी उपेक्षा आता चिंतेची बाब ठरली आहे. याकडे पक्ष आणि पदाधिकारी किती गांभीर्याने हाच विषयी महत्त्वाचा ठरणार आहे.

वेळ देता का कुणी वेळ

आपलीच सत्‍ता जिल्हा परिषदेत आहे? असा प्रश्‍न आता राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पडला आहे. चक्‍क या सदस्यांवर वेळ देता का वेळ अशी म्हण्याची वेळ आली आहे. तास्नतास अधिकार्‍यांच्या केबिनबाहेर त्यांना वेटिंग करावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

सदस्यांशी सन्मानाने वागा

जिल्हा परिषदेत येणार्‍या प्रत्येक नागरिक व सदस्यांशी अधिकार्‍यांनी सन्मानाने वागले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दै.‘पुढारी’बरोबर बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्हा परिषदेत येणार सदस्य जनतेची कामे घेऊन येतात. त्या कामांविषयी त्यांना तळमळ असते. त्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष करू नये.