होमपेज › Pune › भाजप पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

भाजप पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजाचा आढावा आणि विविध कामांतील; तसेच 425 कोटींच्या रस्ते विकासकामांतील गैरव्यवहारावरून सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका अधिकारी व पदाधिकारी आणि कोअर कमिटी सदस्यांची बैठक बुधवारी (दि. 14) बोलाविली आहे. बैठकीत ते विविध प्रश्‍नांवर पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेणार आहेत, असे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. 

425 कोटींच्या रस्ते विकासकामात 90 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार केला जात आहे. त्या कामात रिंग झाली असून, करदात्या नागरिकांच्या 90 कोटींची लूट झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे; तसेच भाजपचे खासदार अमर साबळे यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे भाजपवर जोरदार आरोप होत आहेत. भाजप पदाधिकार्‍यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असून, आर्थिक ओढाताण सुरू आहे.

विविध विकासकामांत गैरव्यवहार होत असल्याचे आरोप भाजपवर जोर धरत आहेत. वाकड येथील जकात नाक्याच्या सीमाभिंतीच्या कामातील ‘रिंग’ शिवसेनेच्या तक्रारीनंतर उघड झाली आहे. सत्ताधार्‍यांसह विविध प्रकरणांत आयुक्तांवर देखील गंभीर आरोप होत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने यावरून भाजपला आरोपीचा पिंजर्‍यात उभे केले आहे. परिणामी, भाजपची शहरभरात नाचक्की होत आहे. त्यातच भाजपचे खासदार साबळे यांनी 425 कोटींच्या कामातील गैरव्यवहारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती. खासदारांच्या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकासकामाचा अहवाल मागविला होता. महापालिकेने त्याच्या अहवाल देखील मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. खासदारांनी चौकशीची मागणी केल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन स्थायी समिती अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. 

महापालिकेतील पदाधिकार्‍यांमध्ये एकवाक्यता नाही. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. गटतटाच्या राजकारणात एकमेकांच्या कामांना खो घातला जात आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात आहे. यामुळे सत्ताधार्‍यांमध्ये अंतर्गत कलह पेटला आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासमोरच पक्षाच्या माजी शहराध्यक्ष व सरचिटणिसांमध्ये हमरीतुमरी झाली होती. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रहाटणी येथे नुकत्याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची जाहीरपणे तक्रार करण्यात आली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार, आमदार, महापालिकेतील मुख्य पदाधिकार्‍यांची 12  आणि 27 जानेवारीची बैठक विविध कारणांमुळे रद्द झाली होती. आता ही बैठक बुधवारी होणार आहे. त्यामुळे ते पक्ष पदाधिकार्‍यांची झाडाझडती घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.