Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Pune › भाजप नेत्यांच्या बैठकांवर बैठका

भाजप नेत्यांच्या बैठकांवर बैठका

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सध्या सत्ताधारी भाजपचे नेते बैठकांवर बैठका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय सोमवारी आला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत दुपारी विविध विषयांवर मॅरेथॉन बैठक घेतली. त्यापूर्वी सकाळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापौर बंगल्यावर बैठक घेतली. या दोन्ही बैठकांना पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकांमधून फक्त चर्चा आणि चर्चाच होत असून, ठोस असा कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने पालिकेचे अधिकार्‍यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. 

शहराध्यक्ष गोगावले यांनी वॉर्डस्तरीय योजनेतील विकासकामांना गती यावी, ही कामे भाजपच्या जाहीरनाम्याशी सुसंगत असावीत आणि पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी महापौर बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिकार्‍यांसह महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले उपस्थिती होती.

प्रभाग समितीचे अध्यक्ष व क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकार वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगत, वॉर्डस्तरीय निधीतील कामाचे नियोजन जून महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करुन निविदा प्रक्रिया सुरू करावी, समान पाणीपुरवठा योजनेतील यावर्षी करायच्या कामांची यादी तयार करावी, नालेसङ्गाई, सिमाभिंतीची कामे, गाळ काढणे, जलपर्णी काढणे, पावसाळ्यात पाणी न साठण्यासाठी उपाययोजना करणे, रस्त्यावरील खड्डे पंधरा दिवसात बुजवावेत, अनधिकृतपणे खोदाईची कामे सुरू असतील तर कारवाई करावे, सफाई कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, राज्य शासनाच्या वृक्षलागवडीच्या कार्यक्रमासाठी ऍमेनिटी स्पेसेस, चौकातील जागा, उपलब्ध जमीनीची यादी तयार करावी, आदी सूचना गोगावले यांनी यावेळी केल्या. या सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या उपस्थितीत पंधरा दिवसांनी बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.