Sat, Apr 20, 2019 18:15होमपेज › Pune › पुरंदर विमानतळ : ‘वर्षा’वर खलबते

पुरंदर विमानतळ : ‘वर्षा’वर खलबते

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 13 2018 12:45AMपुणे : दिगंबर दराडे

पुरंदर येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पॅकेज संदर्भात आणि भूसंपादनाच्या अधिसूचनेवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’वर आज (शुक्रवारी) दुपारी बारा वाजता तातडीची बैठक बोलविली आहे. 

बुधवारी मुंबई येथे पुरंदर विमानतळासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुरंदर विमानतळाच्या अधिसूचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या आठ ते दहा दिवसात अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. 

या आठवड्यात कोणतीही नियोजित बैठक नसताना, विमानतळाच्या संबंधित अधिकार्‍यांना मुख्यमंत्री कार्यालयातून आज (दि.13)रोजी सकाळी बारा वाजता वर्षावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, विमानतळ प्राधिकरणचे एमडी सुरेश कंकाणी, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव वल्सा नायर, नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित राहणार आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर विमानतळाबाबत राज्य व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. पुरंदर विमानतळाला हवाई दलाने मान्यता दिल्यानंतर जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडून पुढील कार्यवाहीसाठी तातडीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांकडून केल्या जाणार्‍या भूसंपादनाच्या मोबदल्यात रक्कम दिली जाणार, की जमीन दिली जाणार याच्या निश्चिती बाबत यावेळी चर्चा होणार आहे.बैठकीत शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या पॅकेजबाबत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांकडून पॅकेजबाबत घोषणा झाली, तर विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाची कार्यवाही वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याचे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्ये होणार असल्याची घोषणा केली होती. विमानतळासाठी जमिनी देण्यास तेथील काही शेतकर्‍यांनी विरोध केला असून, जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. जमिनी ताब्यात घेताना, शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पॅकेजबाबत वेगवेगळ्या स्वरूपात अभ्यास केला जात होता. त्यातून अंतिम निर्णय काय होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. या बैठकीतही पुण्याच्या विमानतळाला चालना देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली असून, आजच्या बैठकीत पॅकेजबद्दलचा अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची दाट चिन्हे आहेत. विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील नेमके कोणते क्षेत्र आणि किती क्षेत्र जाणार आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच भूसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देणे, भूसंपादनाच्या मोबदल्यात शेतकर्‍यांना द्यावयाचे पॅकेज या संदर्भातील अध्यादेश निघणे आवश्यक आहे. मात्र, हे आदेश अद्याप निघालेले नाहीत. त्यामुळे विमानतळ उभारणीच्या दृष्टीने आवश्यक असलेले भूसंपादनाचे सर्वांत महत्त्वाचे काम थांबलेले आहे.

अधिसूचनेनंतरच जिल्हाधिकार्‍यांची बदली?

पुरंदर येथील विमानतळासाठी आवश्यक असणार्‍या भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव राज्याच्या विधी खात्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास कधी मान्यता मिळेल आणि अध्यादेश निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विमानतळाचा प्रश्‍नमार्गी लावण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यांच्याकाळातच भूसंपादनाचा अध्यादेश निघणार का, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. 

 

Tags : pune, pune news, Purandar airport, Devendra Fadnavis, Meeting,