Wed, Jan 23, 2019 04:50होमपेज › Pune › आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘नांदा सौख्य भरे’ची भावना

आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘नांदा सौख्य भरे’ची भावना

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 1:32AMपुणे  : शिवाजी शिंदे

दीर्घ वादावादी तसेच हेवेदाव्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये समेट झाला. राजकीय पक्ष म्हणजे त्या पक्षाच्या नेत्यांपासून अगदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत राजकारण आलेच. अशीच अवस्था मागील दोन महिन्यांपासून शहरातील आरपीआय पक्षामधील पदाधिकार्‍यांमध्ये झाली होती. त्यामुळे हा वाद मिटणार की, विकोपाला जाणार अशी संभ्रमावस्था पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यांमध्ये झाली होती. मात्र खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आदेश दिल्यानंतरसुद्धा पक्षामधील पदाधिकार्‍यांनी एकत्र येण्यास वेळ घेतला. मात्र शेवटी सर्वच पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन समेट घडवून आणला. परिणामी आता पुढील काळात या पक्षाचे पदाधिकारी एका विचाराने नांदतील, अशी अपेक्षा बाळण्यास म्हणण्यास हरकत नाही.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाने मागील अनेक वर्षांपासून शहरातील राजकीय परिघात अनेक चढ उतार पाहिले. एकेकाळी महापालिकेत सात नगरसेवक असलेल्या या पक्षाची राजकीय अवस्था मागील काही वर्षांपूर्वी अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या खमक्या नेतृत्वामुळे शहरातील पदाधिकार्‍यांना प्रोत्साहन देवून पुन्हा एकदा पक्षाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न झाले, काही प्रमाणात हे प्रयत्न यशस्वीदेखील झाले. भाजप बरोबर युती केल्यानंतर महापालिकेत आरपीआयचे चार नगरसेवक निवडून आले (भाजपाच्या पक्ष चिन्हावर) मात्र मध्यंतरी ‘शहराध्यक्ष’ निवडीवरून सुरू झालेला वाद चांगलाच रंगला आणि या पक्षामध्ये सरळसरळ दोन गट पडले. एक विचाराने मार्गक्रमण करीत असलेल्या पदाधिकार्‍यांमध्ये चांगलेच वाद निर्माण झाले आणि एकमेकांच्या विरोधात जाहीर चिखलफेक करू लागले. परिणामी पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता. पक्षामधील वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्येच वाद झाल्यामुळे शहरात पक्षाची अवस्था नक्की काय होणार या चर्चेला उधाण आले होते. मात्र दोन महिन्यांनतर का होईना या पदाधिकार्‍यांनी एकत्र बैठक घेऊन ‘शहराध्यक्ष’ पदावरून उठलेल्या वादावर पडदा टाकला आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ‘नांदा सौख्य भरे’ या उक्तीनुसार राजकीय प्रवास करण्याचे ठरविले आहे.

पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये असलेल्या वादावर पडदा पडला असला तरी मागील दोन महिन्यात पक्षामध्ये जे राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे पक्षाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून आले आहे. या पक्षामध्ये तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याची मोठी जबाबदारी वरिष्ठ पदाधिकार्‍यांवर आहे. मात्र वरिष्ठांमध्येच झालेल्या हेवेदाव्यामुळे कार्यकर्त्यांची फळी तयार होण्यास आता चांगलाच वेळ लागण्याची चिन्हे आहेत. तरुणांची फळी उभारण्यासाठी वरिष्ठांना मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे लागणार आहेत. ही बाब या वरिष्ठ पदाधिकार्‍यांना गांर्भायाने घ्यावी लागणार आहे.