Thu, Apr 25, 2019 17:36होमपेज › Pune › भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला

Published On: May 06 2018 1:54AM | Last Updated: May 06 2018 1:00AMपिंपरी : प्रतिनिधी

क्षेत्रीय सदस्य निवडीमध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी निष्ठावंतांना मंगळवारी (दि.8) प्रदेशाध्यक्षांनी पाचारण केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

आठ क्षेत्रीय कार्यालयावर प्रत्येकी 3 असे एकूण 24 कार्यकर्त्यांना क्षेत्रीय सदस्य म्हणून संधी देताना किमान पक्ष्याबरोबर निष्ठावंत असणार्‍या कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी आशा होती; परंतु त्यांना डावलल्यामुळे शहर भाजपच्या दोन्ही कारभार्‍यांच्या विरोधात  गुरुवारी (दि.26) ला  डॉ.आंबेडकर चौकात उपोषण केल्याने पक्षात खळबळ माजली.त्याची खबर प्रदेश कार्यालयापर्यंत गेली. दुपारी साडे चारनंतर शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली; मात्र जगताप यांना उपोषणकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

त्यानंतर गुरुवारी रात्री पावणे दहा वाजता पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी उपोषणकत्यार्ंबरोबर चर्चा केली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याबरोबर दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. त्याअनुषंगाने मंगळवारी (दि.8) उपोषणकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी बैठकीसाठी बोलविल्याचे समजते. या बैठकीमध्ये निष्ठावंत भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांकडे आपले गार्‍हाणे मांडणार आहेत. त्यांच्याबरोबर पक्षसंघटना व येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा होणार आहे. 

कारण निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला शहरात बसू नये ही त्यापाठीमागची भूमिका असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.