Mon, Nov 19, 2018 04:14होमपेज › Pune › हक्काच्या ३०% जागांवरही उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय प्रवेश

विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

सध्या राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाची अर्थात एमबीबीएस व डेन्टलची प्रवेश  प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र (रेस्ट ऑफ महाराष्ट्र) असे विभाग करून राबवण्यात येत आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबवताना विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करून त्यांच्या हक्काच्या 30 टक्के राखीव जागांवरही रेस्ट ऑफ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे.

प्रवेश प्रक्रिया राबवताना ज्या विभागातील विद्यार्थी आहे, त्याला  त्या विभागात 70 टक्क्यांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तसेच महाराष्ट्रातील अन्य विभागात त्याला 30 टक्क्यांतून प्रवेश देण्यात येतो. विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भागात 70 टक्क्यांमधून प्रवेश देण्यात येतो. रेस्ट ऑफ महाराष्ट्रात त्यांना 30 टक्क्यांमध्ये प्रवेश देण्यात येतो. मात्र, या 30 टक्के जागांवरही त्यांना डावलून रेस्ट ऑफ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे उघडकीस आले आहे.  

विदर्भ, मराठवाड्याच्या मागणीला केवळ आश्‍वासने

विदर्भ व मराठवाड्यात एकतर वैद्यकीय महाविद्यालये ही बोटावर मोजण्याइतकीच आहेत. त्यामुळे त्यांना 70 टक्के कोट्यातून प्रवेश घ्यायचा झाल्यास तो सहजासहजी मिळणे अवघड आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवताना सध्याच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्याची मागणी केली होती. 

शेवटची जागा भरेपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवावी

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने एमबीबीएस, डेन्टल, बीएएमएससह अन्य असलेली शेवटची जागा भरेपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवू नये. रिक्त जागा या खासगी संस्थेकडे वर्ग न करता डीएमईआरनेच पुढील राऊंड घेऊन शेवटची जागा भरेपर्यंत प्रक्रिया राबवावी. जेणेकरून जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांना प्रवेश  मिळेल व त्यांच्यावर अन्याय होणार नाही.