होमपेज › Pune › महापौरांची ऑर्डर पडली महाग

महापौरांची ऑर्डर पडली महाग

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

महापौर कार्यालयाकडून मिळालेली चहाची ऑर्डर हॉटेल व्यावसायिकला गुरूवारी चांगलीच महागात  पडली. समाविष्ट गावांसाठीच्या बैठकित या हॉटेल व्यावसायिकाने प्लॅस्टिकच्या कपात उपस्थितांना चहा दिला. ही बाब बैठकिला उपस्थित असलेल्या घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली, अन संबधित हॉटेलधारकाला थेट 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईचा श्रीगणेशा थेट महापालिकेच्या सभागृहातूनच झाला.

राज्य शासनाने 23 मार्चपासून प्लॅस्टिक बंदी सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या व्यावसायिकांना प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने महिनाभराचा अवधी दिला आहे. त्यानुसार पालिकेकडे प्लॅस्टिक जमा करून घेतले जात आहे. त्यामुळे अद्याप प्रशासनाने दंडात्मक कारवाईला सुरवात केली नव्हती, मात्र, गुरूवारी प्रशासनाला ही कारवाई करावी लागली. 

महापौर मुक्ता टिळक यांनी समाविष्ट 11 गावांमधील लोकप्रतिनिधीं व नागरिकांची बैठक बोलविली, या बैठकिसाठी चहापानाची व्यवस्था महापौर कार्यालयाकडून करण्यात आली होती. महापौर कार्यालयाने नेहमीच्या हॉटेल व्यावसायिकाला 50 कप चहा पुरविण्याची ऑर्डर दिली. त्यानुसार चहा पुरविण्यात आला, मात्र, हा चहा प्लॅस्टिकच्या कपातून देण्यात आला होता. एकिकडे प्लॅस्टिक बंदीची कारवाई सुरू असतानाच थेट महापौरांच्या बैठकितच प्लॅस्टिकच्या कपातून चहा देण्यात येत असल्याचे घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यांनी संबधित व्यावसायिकावर कारवाईचे आदेश दिले, त्यानुसार रात्री उशिरा या व्यावसायिकांकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

6 रुपयांचा चहा 20 रुपयांना

महापौरांनी ऑर्डर दिलेल्या एका चहाच्या किंंमत सहा रुपये इतकी आहे, त्यानुसार हॉटेल व्यावसायिकाला 300 रुपये मिळणार होते, मात्र, पालिकेने केलेल्या 1 हजारांच्या दंडामुळे व्यावसायिकाला हा चहा 20 रुपयांना पडला, व त्यांचा भुदर्डही सहन करावा लागला.

 

Tags : pune, pune news, pune municipal corporation, Mayor, tea order, expensive,