Sat, Jul 20, 2019 09:06होमपेज › Pune › महापौरांची निवड 15 दिवसांत

महापौरांची निवड 15 दिवसांत

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:17AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या दुसर्‍या महापौरांची निवड येत्या 15 दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाची मान्यता घेऊन महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे. महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. त्या पदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयास तातडीने पत्र पाठविले जाणार आहे. 

विभागीय आयुक्तांच्या परवानगीने निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. दिवस निश्‍चित झाल्याच्या 3 दिवस पूर्वी या दोन्ही पदासाठी अर्ज मागविण्यात येतील. विभागीय आयुक्तांच्या प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत दोन्ही पदांची निवड केली जाईल, असे पालिकेचे नगर सचिव उल्हास जगताप यांनी मंगळवारी सांगितले. त्यासाठी जास्तीत जास्त 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. विभागीय आयुक्तांकडून आठवड्याभरात तारीख निश्‍चित झाल्यास ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले. 

महापौर, उपमहापौर नसणार काळजीवाहू

महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा दिल्याने त्यांना आता प्रभारी किंवा काळजीवाहू म्हणून पद सांभाळता येणार नाही. राजीनामा दिल्यानंतर ते दोघे आता माजी महापौर व माजी उपमहापौर होऊन केवळ नगरसेवक राहिले आहेत. त्यांना आता या पदासाठी कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करता येणार नाहीत. राजीनामा दिल्याने त्यांनी पालिकेची वाहनेही सोडली आहेत. महापौर काळजे हे आपल्या नव्या कोर्‍या मोटारीतून चर्‍होलीच्या घराकडे रवाना झाले. तर, उपमहापौर या आपल्या खासगी वाहनातून प्राधिकरण, निगडीकडे रवाना झाल्या. तत्पूर्वी दोघांनी दुपारपर्यंत आपले नियमित कामकाज पूर्ण केले.