Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौरांनी दिला राजीनामा

पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौरांनी दिला राजीनामा

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:36AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी स्वखुषीने राजीनामा दिल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. महापौर काळजे यांनी राजीनामा द्यावा, असा निरोप मुंबईहून मिळाल्याने त्यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला. महापौरांसोबतच उपमहापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचा असल्याने उपमहापौर मोरे यांनीही लगोलग महापौर काळजे यांच्याकडे राजीनामा सादर केला. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक व महापौरांचे समर्थक उपस्थित होते. महापौर हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असून, उपमहापौर मोरे या निष्ठावंत गटाच्या आहेत. 

राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर काळजे म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत आहे. सव्वा वर्षापेक्षा अधिक काळ महापौरपद भूषविले. भाजपची पालिकेत प्रथमच सत्ता आली आणि पक्षाने भाजपचा पहिला महापौर होण्याची मला संधी दिली. त्यामुळे मी आनंदी आणि समाधानी आहे. माझ्या कार्यकाळात अनेक कामे करता आली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पाच वर्षांसाठी जरी मुदत मिळाली तरी कामे शिल्‍लक राहतात. शहराचा पाण्याचा गंभीर प्रश्‍न मार्गी न लावल्याची खंत असल्याचे ते म्हणाले. 

उपमहापौर मोरे म्हणाल्या की, उपमहापौर असताना शहरासाठी काम करता आले हे माझ्यासाठी भाग्य समजते. गृहिणी असताना प्रथमच निवडून आले. लगोलग उपमहापौरपद मिळाले. यापुढेही प्रभागातील कामे करत राहणार आहे. भविष्यात पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, मुळात फेबु्रवारी महिन्यातच महापौरांनी राजीनामा देऊ केला होता. पक्षाच्या भूमिकेनुसार योग्य नगरसेवकाची महापौर व उपमहापौरपदासाठी येत्या 8 दिवसांमध्ये निवड केली जाईल. पक्षाच्या वतीने सामूहिक निर्णय घेऊन नावे निश्‍चित केली जातील. महापौर व उपमहापौरपदाच्या राजीनाम्याचा निर्णय केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेत झाला आहे. राज्यात इतर ठिकाणच्या पालिकांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. 

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर दुसर्‍या दिवशी राजीनामा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी एका कार्यक्रमासाठी शहरात येवून गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मंगळवारी काळजे व मोरे यांनी तडकाफडकी पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कालच त्यांना तशा सूचना दिल्या होत्या, अशी चर्चा रंगली आहे.