Sat, Apr 20, 2019 08:22होमपेज › Pune › महापौर विकासनिधीच वळविला रेनकोट, दप्तरे खरेदीला

महापौर विकासनिधीच वळविला रेनकोट, दप्तरे खरेदीला

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:22AMपिंपरी : जयंत जाधव

महापौर विकासनिधी हा जनतेच्या आपत्कालीन व निकडीच्या विकासकामांसाठी वापरला जातो. परंतु; पिंपरी-चिंचवडचे भाजपचे महापौर नितीन काळजे व लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमत करून मुंबईतील ठेकेदाराच्या भल्यासाठी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचा महापौर विकासनिधीच चक्क रेनकोट, दप्तर व पाट्या खरेदीला वळविल्याचे कारस्थान केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

महापालिकेत महापौर हे अतिशय मान-सन्मान असलेले पद आहे. महापौर अनेक कार्यक्रमांनिमित्त शहरातील विविध भागात जात असतात. त्यावेळी तेथील नागरिक त्यांना अनेक समस्या व विकासकामे सांगत असतात. परंतु; महापौरांना आर्थिक अधिकार फार कमी प्रमाणात आहेत. परंतु; या पदाचा मान राखला जावा म्हणून महापौरांनी एखाद्या आपत्कालीन कामासाठी अथवा जनतेच्या हितासाठी काही कामे सूचविल्यास ती करता यावीत म्हणून महापौर विकास निधीची संकल्पना पुढे आलेली आहे. परंतु; पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लेखा विभागातील एका चतुर वरिष्ठ अधिकार्‍याने शिक्षण मंडळातील वादगस्त रेनकोट, दप्तर व पाट्या खरेदी करुन ठेकेदाराचे भले करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातील महापौर विकास निधीतील 5 कोटी तरतूदीपैकी सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयेच वर्ग करण्याचा कट रचला. त्यानुसार महापौर काळजे यांनीही त्याला दुजोरा देत 19 मे 2018 रोजी हा निधी वर्ग करण्यासाठी लेखी पत्र दिले. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर 
यांनीही तातडीने 21 मे 2018 रोजी त्याला मंजूरी दिली.

महापालिकेचे शिक्षण मंडळ गेली अनेक वर्षे रेनकोट, दफ्तरे व पाट्या आदी शालेय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम झाले आहे. महापालिकेत सत्तांतर होवून भाजपाची सत्ता कधी नव्हे ती आली तरी त्याच गोष्टी अतिशय बेमालूमपणे भाजपचे महापौर पदावरील पदाधिकारी करीत असल्याने याबाबत महापालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा आहे. महापौरांनी  ठेकेदाराच्या हितसंबंधासाठी दिलेल्या पत्रानुसार 2 कोटी 65 लाखांपैकी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदीला 1 कोटी 70 लाख रुपये, विद्यार्थ्यांच्या दप्तरे व पाट्या खरेदीला 70 लाख रुपये व बालवाडी दप्तरे खरेदीसाठी 35 लाख रुपये तरतूद वर्ग केलेली आहे. 

शिक्षण मंडळाच्या बुट खरेदीसाठी 1 कोटी 15 लाखांची आवश्यकता लागते. परंतु; महापालिकेच्या अर्थसंकल्पानुसार फक्त 28 लाख रुपयांची तरतूद शिल्लक आहे.  त्यामुळे या वर्षी विद्यार्थी महापालिका शाळेत अनवाणीच जाणार अशी परिस्थिती आहे. तर; महापौर, लेखा विभागाचा वरिष्ठ अधिकारी व ठेकेदाराचे संगनमत न झाल्यामुळे बुट खरेदीसाठी मात्र महापैर विकास निधीतून 87 लाखांचा निधी वर्ग केला गेला नसल्याचीाही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बाबत महापौर काळजे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.